Tuesday, June 9, 2026

Ahilyangar Crime News : मावा न दिल्याचा संताप ? मध्यरात्री वाहनांची तोडफोड, शहर हादरलं

Ahilyangar Crime News : मावा न दिल्याचा संताप ? मध्यरात्री वाहनांची तोडफोड, शहर हादरलं

Ahilyangar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) शहरात मध्यरात्री गुंडांचा हैदोस पहायला मिळाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गुंडगिरी आणि दहशतीच्या एका थरारक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.केवळ मावा दिला नाही म्हणून काही उपद्रवी तरुणांच्या टोळक्याने हातात धारदार हत्यारे आणि लाकडी दांडके घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

धारणगाव रोड परिसरात टोळक्याचा धुमाकूळ

रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांसह विशेषतः धारणगाव रोड परिसरात या टोळक्याने धुमाकूळ घालत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवला. धारदार हत्यारे आणि दांडक्यांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले. (Ahilyangar Crime News )

थरारक घटनेनं परिसरात खळबळ

रविवारी रात्रीच्या शांततेत अचानक सुरू झालेल्या या थरारक घटनेनं सर्वच हादरवून गेले. आरडाओरड, दगडफेक आणि तोडफोडीमुळे परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले.महिलांमध्ये आणि स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मावा न दिल्याचा संताप ?

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार “मावा दिला नाही” या कारणातून घडल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. नेमका वाद कशामुळे झाला, याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळपर्यंत या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. त्यामुळे दहशत माजवणारे हे नेमके कोण होते, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

Comments
Add Comment