BMC News : अंधेरीतील चार हॉटेल आणि बारवर महानगरपालिकेकडून तोडक आणि जप्तीची कारवाई

उपाहारगृह (हॉटेल) परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीत व कार्यरत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे आवाहन


मुंबई : दिल्ली येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी हॉटेल आग दुर्घटनेने अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक, पर्यटक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत मुंबईतील सर्व उपाहारगृह (Hotel) परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरुपी सुस्थितीत व कार्यरत ठेवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच, ०६ ते २० जून २०२६ या कालावधीदरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडून विविध विभागांच्या सहकार्याने विशेष संयुक्त तपासणी मोहीम आयोजित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे अंधेरी (पश्चिम) येथील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई व होमटाऊन या हॉटेल आणि बारवर तोडक व जप्तीची कारवाई करण्यात आली.


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रविंद्र आंबुलगेकर यांच्या नेतृत्वात मुंबईत अग्निशमनविषयक विविध उपाययोजना केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर, उपाहारगृहांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच, विशेष संयुक्त तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.



अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबत सांगितले की, महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम - २००६ नुसार, सर्व अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीत व कार्यरत ठेवणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने, मुंबईतील सर्व उपाहारगृहे (Hotel) परिसरात स्थापित अग्निशामक यंत्रे , स्प्रिंकलर प्रणाली (Sprinkler system) , अग्निसूचना व शोध प्रणाली , किचन डक्टिंग (Kitchen Ducting) व्यवस्था, हायड्रंट प्रणाली (Fire Hydrant System) तसेच आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग आदी सर्व अग्निसुरक्षा यंत्रणा २४ तास कार्यरत, सुरक्षित व कोणत्याही अडथळ्याविना उपलब्ध ठेवाव्यात. तसेच, अग्निसुरक्षा यंत्रणांची वर्षातून दोन वेळा (जानेवारी व जुलै महिन्यात) शासनमान्य परवानाधारक संस्थेमार्फत तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. सदर तपासणीनंतर प्राप्त होणारे अनुपालन प्रमाणपत्र अर्थात ‘फॉर्म-बी’ कोणताही विलंब न करता नियमितपणे मुंबई अग्निशमन दलाकडे सादर करावा, असे निर्देश देखील जोशी यांनी दिले आहेत.


दरम्यान, ०६ ते २० जून २०२६ या कालावधीदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या सहकार्याने मुंबई अग्निशमन दलाकडून विशेष संयुक्त तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत, बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) मॉल, तारांकित निवासी हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल, बँक्वेट हॉल, रुफ टॉप, पब, नाईट क्लब, रेस्टॉरंट व बार, ऑर्केस्ट्रा बार, जिमखाना तसेच अन्य ठिकाणांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येईल. , ही मोहीम या कालावधीनंतरही नियमितपणे सुरू राहील, असेही जोशी यांनी सांगितले.



अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक उत्तरदायित्व देखील आहे. त्यामुळे, अग्निसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून सर्व उपाहारगृह मालक, व्यवस्थापक व संबंधित घटकांना करण्यात येत आहे.


दरम्यान, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात प्रशासकीय विभाग (वॉर्ड) सार्वजनिक आरोग्य विभाग, अनुज्ञापन विभाग, इमारत व कारखाना विभाग आणि मुंबई अग्निशमन दल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अंधेरी (पश्चिम) येथील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई व होमटाऊन या हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. नियमांनुसार राखीव असलेल्या अनिवार्य खुल्या जागेचा वापर या आस्थापनांकडून स्वयंपाकघर व सेवा क्षेत्रासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर खुल्या जागेवरील अनधिकृत आच्छादन व बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच, १७ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, १ नायट्रोजन गॅस सिलिंडर, १ गॅस बँक, ४ कुकिंग रेंज तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन जप्त करण्यात आले.

Comments
Add Comment

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील