MVA : विधान परिषद निवडणुक; अर्ज माघारीवरून 'मविआ'त फूट

घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव


मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत (मविआ) उभी फूट पडली आहे. जागावाटप आणि संख्याबळाचे साधे गणित न मांडता ऐनवेळी उमेदवारांनी घेतलेल्या माघारीमुळे मविआवर मोठी नामुष्की ओढवली असून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मविआच्या जवळपास १० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ठाणे, यवतमाळ, वर्धा, अहमदनगरसह पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या नामुष्कीनंतर पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी उद्वेगातून थेट 'मविआ'तूनच बाहेर पडण्याचा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवल्याने आघाडीतील बिघाडी उघड झाली आहे.


उमेदवारांच्या या माघारीवरून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तब्बल १५० कोटी रुपयांच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला. "पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील उमेदवारांवर अर्ज माघारीसाठी एका दिवसात १५० कोटी रुपये उडवण्यात आले. कोकणातील उबाठा गटाच्या उमेदवाराला माघारीसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले, त्यातील १५ कोटी रुपये वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एका हॉटेलमध्ये सुपूर्द करण्यात आले," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. मात्र, पुरेशा संख्याबळाअभावी पराभव निश्चित दिसू लागल्यानेच हे बेछूट आरोप केले जात आहेत, असा जोरदार पलटवार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.



राऊत तिथे 'वॉचमनगिरी' करत होते का? - संजय शिरसाट


संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "२५ कोटी रुपये म्हणजे खिशात टाकून फिरायचा पॉकेटमनी आहे का? राऊतांना जर ही सर्व माहिती होती, तर ते तिथे काय वॉचमनगिरी करत होते? त्यांनी पोलिसांना का कळवले नाही?" असा सवाल त्यांनी केला. "मविआच्या नेत्यांमध्ये कधीही जागावाटपाबाबत एकत्र बैठक झाली नाही, त्यांच्याकडे आकडेच जुळत नसल्याने उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली. आता पराभव समोर दिसू लागल्याने पैशांचे आरोप करायचे हा विरोधकांचा धंदाच झाला आहे," अशी टीका त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही "पैसे मोजायला राऊत तिकडे गेले होते का?" असा टोला लगावत, माघार घेणारे उमेदवार समजूतदार असून त्यांनी आपल्याकडील आणि महायुतीकडील मतांचे संख्याबळ पाहूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.



पुणे अन् सोलापूरमध्ये मित्रपक्षांकडून विश्वासघात


पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे पुण्याची जागा बिनविरोध झाली. मात्र, ही माघार घेताना मविआतील घटक पक्षांना विश्वासात घेतले नसल्याने काँग्रेस आणि उबाठा गटात तीव्र संताप आहे. उबाठा गटाचे नेते वसंत मोरे यांनी यात पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.दुसरीकडे, सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. "माझा मुलगा जीवन जानकर याची उमेदवारी फायनल झालेली असताना मोहिते-पाटलांनी ऐनवेळी देशमुखांना पुढे करून माझा केसाने गळा कापला," असा आरोप जानकर यांनी केला. यावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, "हा आमच्या घरातील प्रश्न असून तो आम्ही घरात बसून सोडवू," अशी मखलाशी केली.



काँग्रेसला स्वतःचे लोक सांभाळता येईनात - बावनकुळे


याबाबत प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडगिरीचे राजकारण केलेले नाही. असा प्रकार काँग्रेसने देशात ६५ वर्षे केला, तर मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनीही सत्तेचा वापर करून गुंडशाहीच्या जोरावर निवडणुका लढवल्या. आता राज्यात एक तरी असा उमेदवार दाखवा, ज्याच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. काँग्रेसला स्वतःचे लोक सांभाळता येत नसल्यामुळेच ते आता महायुतीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत."



संजय राऊतांनी तब्येतीची काळजी घ्यावी - मंत्री नितेश राणे


याविषयी प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "संजय राऊत यांनी महायुतीवर १५० कोटींच्या घोडेबाजाराचे जे बेछूट आरोप केले आहेत, त्याबाबत त्यांनी आधी ठोस पुरावे सादर करावेत. निवडणुकीत स्वतःला किंवा त्यांच्या पक्षाला काही मिळाले नाही, याच वैयक्तिक दुःखातून ते असे आरोप करत आहेत का? काही महिन्यांपूर्वी भांडुपमध्ये गांजाची शेती आढळल्याचे मी ऐकले होते. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या मानसिक आणि शारीरिक तब्येतीची विशेष काळजी घ्यावी."महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्वतःच्याच नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, म्हणूनच त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. विरोधकांच्या उमेदवारांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःचे अर्ज मागे घेतल्यामुळेच या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, हे राऊतांनी लक्षात ठेवावे. महायुतीमधील पक्षांचा जोड हा अत्यंत मजबूत आहे. आमची एकी पाहून आता 'फेविकॉल' कंपनीवाले देखील त्यांच्या जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत, इतकी भक्कम ताकद महायुतीची आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी

Nashik Simhastha Kumbhmela : ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’, २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ची भक्ती आणि

Nashik Crime News : 'माझा नाद सोडून दे, माझे...', प्रेम नाकारल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या नवीन प्रेयसीच्या छळाला

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Ahilyanagar Crime : संतापजनक ! धावत्या एसटीत गुंडाची महिलेवर लघुशंका, पुढे...

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे एका तळीराम गुंडाने माणुसकीची हद्द पार