घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत (मविआ) उभी फूट पडली आहे. जागावाटप आणि संख्याबळाचे साधे गणित न मांडता ऐनवेळी उमेदवारांनी घेतलेल्या माघारीमुळे मविआवर मोठी नामुष्की ओढवली असून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मविआच्या जवळपास १० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ठाणे, यवतमाळ, वर्धा, अहमदनगरसह पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या नामुष्कीनंतर पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी उद्वेगातून थेट 'मविआ'तूनच बाहेर पडण्याचा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवल्याने आघाडीतील बिघाडी उघड झाली आहे.
उमेदवारांच्या या माघारीवरून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तब्बल १५० कोटी रुपयांच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला. "पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील उमेदवारांवर अर्ज माघारीसाठी एका दिवसात १५० कोटी रुपये उडवण्यात आले. कोकणातील उबाठा गटाच्या उमेदवाराला माघारीसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले, त्यातील १५ कोटी रुपये वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एका हॉटेलमध्ये सुपूर्द करण्यात आले," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. मात्र, पुरेशा संख्याबळाअभावी पराभव निश्चित दिसू लागल्यानेच हे बेछूट आरोप केले जात आहेत, असा जोरदार पलटवार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ...
राऊत तिथे 'वॉचमनगिरी' करत होते का? - संजय शिरसाट
संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "२५ कोटी रुपये म्हणजे खिशात टाकून फिरायचा पॉकेटमनी आहे का? राऊतांना जर ही सर्व माहिती होती, तर ते तिथे काय वॉचमनगिरी करत होते? त्यांनी पोलिसांना का कळवले नाही?" असा सवाल त्यांनी केला. "मविआच्या नेत्यांमध्ये कधीही जागावाटपाबाबत एकत्र बैठक झाली नाही, त्यांच्याकडे आकडेच जुळत नसल्याने उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली. आता पराभव समोर दिसू लागल्याने पैशांचे आरोप करायचे हा विरोधकांचा धंदाच झाला आहे," अशी टीका त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही "पैसे मोजायला राऊत तिकडे गेले होते का?" असा टोला लगावत, माघार घेणारे उमेदवार समजूतदार असून त्यांनी आपल्याकडील आणि महायुतीकडील मतांचे संख्याबळ पाहूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
पुणे अन् सोलापूरमध्ये मित्रपक्षांकडून विश्वासघात
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे पुण्याची जागा बिनविरोध झाली. मात्र, ही माघार घेताना मविआतील घटक पक्षांना विश्वासात घेतले नसल्याने काँग्रेस आणि उबाठा गटात तीव्र संताप आहे. उबाठा गटाचे नेते वसंत मोरे यांनी यात पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.दुसरीकडे, सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. "माझा मुलगा जीवन जानकर याची उमेदवारी फायनल झालेली असताना मोहिते-पाटलांनी ऐनवेळी देशमुखांना पुढे करून माझा केसाने गळा कापला," असा आरोप जानकर यांनी केला. यावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, "हा आमच्या घरातील प्रश्न असून तो आम्ही घरात बसून सोडवू," अशी मखलाशी केली.
बुलढाणा : मागील महिन्यात शिवानी कळमेकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होत. भावाने आणि बापाने आपल्या मुलीचं शिर कापून अत्यंत ...
काँग्रेसला स्वतःचे लोक सांभाळता येईनात - बावनकुळे
याबाबत प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडगिरीचे राजकारण केलेले नाही. असा प्रकार काँग्रेसने देशात ६५ वर्षे केला, तर मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनीही सत्तेचा वापर करून गुंडशाहीच्या जोरावर निवडणुका लढवल्या. आता राज्यात एक तरी असा उमेदवार दाखवा, ज्याच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. काँग्रेसला स्वतःचे लोक सांभाळता येत नसल्यामुळेच ते आता महायुतीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत."
रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग तालुक्यातील 85 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण ...






