मुंबई : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Legislative Council elections) रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच, नाशिक (Nashik) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला धक्का बसला आहे. बंडखोरीचे वादळ शमवण्यात भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) शीर्षस्थ नेत्यांना अपयश आले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली नाही. परिणामी, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते (Gokul Gite) आणि भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे (Prasad Hire) अशी त्रिकोणी लढत आता नाशिकमध्ये रंगणार आहे. या दुहेरी बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच, गीतेंना स्वपक्षातील नाराज आणि विरोधी पक्षाकडूनही छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने, नाशिकच्या या रणांगणात बंडखोर गोकुळ गीतेंचे पारडे नेमके किती जड ठरणार? यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या या लढाईत अनेक अनपेक्षित ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. गोकुळ गीते यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली नसली, तरी त्यांचे मन वळवण्यासाठी महायुतीकडून अजूनही पडद्याआड शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गीतेंनी उमेदवारी कायम ठेवून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेकडून केली जात आहे. याच रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
दरम्यान, नाशिकमधील महायुतीचे एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पारडे जड दिसत आहे. ६०३ पैकी तब्बल ४५४ मते एकट्या महायुतीकडे असल्याने कागदावर दराडे यांचे पारडे अत्यंत मजबूत आहे. मात्र, ऐनवेळी पडद्यामागे काही घडामोडी घडल्यास, किंवा अंतर्गत नाराजीतून क्रॉस व्होटिंग झाल्यास नाशिकच्या राजकारणात मोठा उलटफेर होऊ शकतो.
मुंबई: मुंबईजवळ समुद्रात कार्यरत असलेल्या एका तेलवाहू जहाजावर दुर्दैवी घटना घडली असून जहाजावरील ४३ वर्षीय मुख्य अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ...
गोकुळ गीते नेमके कोण?
गोकुळ गीते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे सख्खे भाऊ आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती आणि त्या संपूर्ण निवडणुकीचे पडद्यामागचे नियोजन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते. पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोनवेळा संचालक म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते सध्या सायखेडा गटातून जिल्हा परिषदेची तयारी करत असून, स्थानिक पातळीवर आणि ग्रामीण भागात त्यांची स्वतःची मजबूत पकड मानली जाते.
'उबाठा'ची माघार, नाराजीचा गीतेंना फायदा?या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून 'उबाठा' गटाला नाशिकची जागा सुटली होती. माजी आमदार वसंत गिते किंवा अनिल कदम निवडणूक लढवतील अशी चर्चा असतानाच, ऐनवेळी ठाकरे गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. ५२ हून अधिक हक्काची मते असतानाही लढत न दिल्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आणि मित्रपक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी शप) यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हाच असंतोष शमवण्यासाठी मविआची हक्काची मते आता अपक्ष असलेल्या गोकुळ गीतेंच्या पारड्यात टाकून महायुतीला शह देण्याचा छुपा डाव आखला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नाशिकमधील पक्षनिहाय संख्याबळ - भाजप : १८६ - शिवसेना : १६१ - राष्ट्रवादी : १०७ - उबाठा गट : ४६ - राष्ट्रवादी (शरद पवार गट) : ०३ - काँग्रेस : ०९ - इतर / अपक्ष (एमआयएम, सपा, इस्लाम पार्टी व इतर) : ९१ - एकूण ६०३





