पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; देवगड-निपाणी, विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर 'एशियन चेरी', 'ताम्हण'ची लागवड
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्यात भर घालण्यासोबतच येथील पर्यटनाला नवा बहर आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या देवगड-निपाणी आणि विजयदुर्ग-कासार्डे या दोन प्रमुख महामार्गांच्या दुतर्फा आता रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या 'ताम्हण'सह 'एशियन चेरी', गुलमोहर आणि कांचन यांसारख्या देखण्या प्रजातींचा समावेश असेल.
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक असलेली गाड्या बदलण्याची कसरत आणि दादर-कुर्ल्यासारख्या स्थानकांवरील प्रचंड ...
राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. देवगड–निपाणी (६२ किलोमीटर) आणि विजयदुर्ग–कासार्डे (५० किलोमीटर) अशा एकूण ११२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा हा हरित पट्टा (ग्रीन कॉरिडॉर) निर्माण केला जाणार आहे. रस्त्यावरून प्रवास करताना पर्यटकांना एका वेगळ्या सौंदर्याचा अनुभव यावा, या दृष्टीने झाडांची निवड करण्यात आली आहे. यात रंगीबेरंगी फुलांच्या झाडांसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आकाश शेवगा, जांभूळ, साग आणि शिसम यांसारख्या वृक्षांचीही लागवड केली जाईल, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
भौगोलिक परिस्थितीला अनुरूप प्रजातींची निवड करा!
बैठकीत बोलताना पालकमंत्री राणे यांनी, शासकीय प्रक्रियेचा म्हणून वृक्षारोपण न करता, लावलेली झाडे दीर्घकाळ टिकून राहतील यादृष्टीने प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. "स्थानिक हवामान आणि कोकणच्या भौगोलिक परिस्थितीला अनुरूप अशाच प्रजातींची निवड करण्यात यावी. तसेच ही झाडे जगवण्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी," अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.





