Tuesday, June 2, 2026

PM Modi : पंतप्रधान मोदी नेहरूंना मागे टाकणार, सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम करणार

PM Modi : पंतप्रधान मोदी नेहरूंना मागे टाकणार, सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला मंगळवार ९ जून २०२६ रोजी दोन वर्षे पूर्ण होतील. मोदी त्याच दिवशी नेहरूंना मागे टाकत सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम नोंदवतील. यानंतर बुधवार १० जून रोजी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर केला जाईल.

"> आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू हा ठराव सादर करतील. मित्रपक्षांचे नेते या ठरावाला पाठिंबा देतील. या ठरावात पंतप्रधान म्हणून गेल्या बारा वर्षांतील कामगिरीवर प्रकाश टाकला जाईल.

जवाहरलाल नेहरू यांनी १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते सलग चार हजार ३९७ दिवस म्हणजेच १२ वर्षे आणि १४ दिवस देशाचे नेतृत्व करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार ९ जून २०२६ रोजी नेहरूंना मागे टाकत नव्या विक्रमाची नोंद करतील. मोदी स्वतंत्र भारताचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून ९ जून रोजी सलग चार हजार ३९८ दिवस म्हणजेच १२ वर्षे आणि १५ दिवस देशाचे नेतृत्व करण्याचा विक्रम करतील.

नेहरू १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंतप्रधान झाले असले तरी, ते पहिल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हंगामी सरकारचे प्रमुख होते. निवडून आलेले पंतप्रधान नव्हते. ते २७ मे १९६४ रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत पंतप्रधान राहिले. जवाहरलाल नेहरूंचा संपूर्ण कार्यकाळ विचारात घेतला तर तो सहा हजार १३० दिवसांचा होतो. यात त्यांनी हंगामी किंवा निवडून न आलेल्या सरकारचे नेते म्हणून केलेल्या कामाच्या कालावधीचा म्हणजेच एक हजार ७३३ दिवसांच्या कार्यकाळाचाही समावेश होतो.

नरेंद्र मोदी यांनी आधीच अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा दोन हजार २७२ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम कधीच मागे टाकला आहे. सलग तीन निवडणुका जिंकणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक सलग कार्यकाळाचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून ते सातत्याने सरकारचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर २६ मे २०१४ पासून आतापर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. अशाप्रकारे, मोदींनी निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नऊ हजार दिवसांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला आहे.

Comments
Add Comment