Mantri Nitesh Rane : वर्सोवा ते मांडवा जलवाहतूक सुरू करणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; मच्छिमार संस्थांना शासन सहकार्यातून इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देणार


मुंबई : मुंबईतील जलवाहतुकीला अधिक गतिमान करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी महायुती सरकारकडून महत्त्वाकांक्षी पावले उचलली जात आहेत. याअंतर्गत मुंबईकरांना अलिबागशी जोडण्यासाठी पावसाळ्यानंतर 'वर्सोवा ते मांडवा' अशी नवीन जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केली. अंधेरी येथील मांडवी गल्ली भागात आयोजित 'वर्सोवा प्रवासी जेट्टीचे उद्घाटन आणि सुशोभीकरण' कार्यक्रमात ते बोलत होते. या जलमार्गावरील प्रवास अधिक पर्यावरणपूरक आणि दर्जेदार करण्यासाठी स्थानिक मच्छिमार संस्थांना शासन सहकार्यातून आधुनिक इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


या सोहळ्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे (एमएमबी) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., संचालक मंडळाचे सदस्य अभिजित ब्रह्मनादकर आणि बाळासाहेब देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वर्सोवा ते मढ या अत्यंत वर्दळीच्या जलमार्गावर प्रवास करणाऱ्या वार्षिक सुमारे ८० लाख प्रवाशांच्या सुविधेसाठी 'व्हॉट्सॲप आधारित डिजिटल तिकीट प्रणाली'चा शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाइन सुविधेमुळे प्रवाशांना आता घरातून निघण्यापूर्वीच फेरीचे तिकीट बुक करता येणे शक्य होणार असून तिकीट विक्रीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल.



वर्सोवा जेट्टी परिसरातील सुशोभीकरणाचे काम महाराष्ट्र सागरी महामंडळाने अवघ्या ४५ दिवसांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण केले आहे. यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, दुर्गंधी, गॅरेज, अवैध बांधकामे आणि भंगार सामानाचे साम्राज्य होते. त्यामुळे प्रवाशांना जेट्टीपर्यंत पोहोचणे कठीण होत असे. हे सर्व अतिक्रमण हटवून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि योग्य राजकीय नेतृत्वामुळे हा बदल शक्य झाल्याचे सांगत नितेश राणे यांनी 'एमएमबी'च्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि पुढील प्रकल्प ३० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या दर्जेदार सुविधेमुळे आता तिकीट दरांमध्ये किरकोळ सुधारणा करून मच्छिमार संस्थांना अधिक सक्षम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



 

जलवाहतुकीचे जाळे सक्षम करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीनुसार संपूर्ण मुंबई आणि एमएमआर क्षेत्राला 'मुंबई वॉटर मेट्रो'च्या माध्यमातून जोडण्याचा सरकारचा संकल्प आहे. ज्याप्रमाणे मुंबईकर मेट्रोने विविध ठिकाणी प्रवास करतात, त्याच धर्तीवर आगामी काळात वर्सोवा जेट्टीवरून थेट नरिमन पॉईंटपर्यंत जलमार्गाने प्रवास करता येईल, अशा वॉटर मेट्रो प्रकल्पावर काम सुरू असल्याचे बंदरे विकास मंत्र्यांनी सांगितले. या विकास प्रक्रियेत स्थानिक मच्छिमार बांधवांना पूर्णपणे विश्वासात घेतले जाईल आणि त्यांच्या रोजगाराला बाधा येऊ दिली जाणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी जेट्टी परिसरात अनधिकृत बांधकामांना थारा न देता कायदेशीररित्या छोटे कॅफे, रेस्टॉरंट्स आणि ज्यूस सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. मढ येथील मार्वे जेट्टीच्या सुशोभीकरणाचे कामही पावसाळ्यानंतर हाती घेतले जाईल.





खा. राणे साहेबांच्या आदर्शावर काम सुरू


"महाराष्ट्रात आणि देशात गतिमान प्रशासन कशाला म्हणतात आणि त्वरित निर्णय घेऊन विकासाला चालना कशी दिली जाते, याचा एक आदर्श सन्माननीय नारायण राणे साहेबांनी आपल्या नऊ महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यासमोर उभा केला," अशा शब्दांत बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.ते म्हणाले की, "राणे साहेबांनी मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना प्रशासन चालवले नाही, तर 'प्रशासनाला पळवणे' काय असते, हे देशाला आणि राज्याला दाखवून दिले आहे. आम्ही सगळे त्याच मार्गावर चालणारे लोक आहोत. साहेबांची एक शिस्त आहे; ते कुठलाही प्रकल्प सुरू करताना कंत्राटदार आणि आर्किटेक्टला कामाची अंतिम तारीख देऊन टाकतात. त्या दिलेल्या तारखेलाच तो प्रकल्प पूर्ण होतो, हा त्यांचा प्रशासकीय दरारा आहे. त्यांच्या याच मार्गदर्शनामुळे आम्ही केवळ ४५ दिवसांत वर्सोवा जेट्टीचा कायापालट करण्याचा विक्रम करू शकलो.आज दीड वर्ष या खात्याचा मंत्री म्हणून काम करताना, ज्या खात्याची धुरा २०१४ पूर्वी साहेबांनी सांभाळली होती, त्याच खात्याच्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करून 'त्यांचा मुलगा काय काम करतोय' हे दाखवण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे," असे भावुक उद्गार नितेश राणे यांनी काढले.



 

अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग यांच्याकडून राणे कुटुंबीयांचे कौतुक


यावेळी अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग आपले अनुभव कथन करताना म्हणाल्या, "गेल्या २५ वर्षांपूर्वी जेव्हा मी मढ आयलंड परिसरात राहायला आले, तेव्हा माझे बच्चे कंपनी खूप लहान होती. त्या काळात वर्सोवा जेट्टी आणि येथील फेरीच्या प्रवासाची दुरवस्था काय होती, हे येथील प्रत्येक रहिवाशाने आणि आम्ही जवळून अनुभवले आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने या परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे, ते खरोखरच अद्भूत आहे. माजी मुख्यमंत्री मंत्री नारायण राणे साहेब आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या जेट्टीसाठी आणि महाराष्ट्राच्या जलवाहतुकीसाठी जे ऐतिहासिक कार्य केले आहे, ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या या विकासकामामुळे या छोट्याशा भागात जणू 'जंगल मे बहार' आली आहे," अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग यांनी राणे कुटुंबीयांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. या सोहळ्यात अर्चना पुरन-सिंग यांनी मुंबईत इतकी वर्षे राहूनही उत्तम मराठी बोलता न आल्याबद्दल जाहीर खंत व्यक्त केली. मात्र, त्यांनी मराठी भाषेबद्दलचा आपला आदर व्यक्त करताना एक भावनिक संकल्प बोलून दाखवला. "माझी मुले आता लग्नाच्या वयाची झाली आहेत. मुंबईत राहून मला मराठी शिकता आली नाही याची मला खंत आहे; पण माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहील की, माझ्या मुलांची जी पुढची पिढी येईल, ती त्यांची पहिली भाषा म्हणून 'मराठी'च शिकेल. मला हे मनापासून हवे आहे," अशी इच्छा त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Harbour Line Block : हार्बर मार्गावर चार दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक

काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरकरांचा पाणीप्रश्न मिटणार

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर

Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

गोरेगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, दोघांना अटक मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने गोरेगाव (Goregaon) पश्चिम

Chandrashekhar Bawankule : वसईतील कोळीवाड्यांना 'गावठाण'चा दर्जा मिळणार

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; कोळीवाड्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची