संवाद-गुरुनाथ तेंडुलकर
ही कथा आहे १७व्या दशकातील... त्यावेळी रशियामध्ये झार निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. अत्यंत क्रूर आणि अत्यंत लहरी स्वभावाच्या या राजानं सर्वसामान्य लोकांचं जीवन अगदी त्राही भगवान करून सोडलं होतं. त्याने स्वतःच्या ऐषोआरामासाठी सामान्य जनतेवर अन्याय्य असे अनेक कर लादले होते. त्या करांमुळे प्रचंड महागाई वाढली होती. अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय धडाधड बंद पडत होते. त्याच्याविरोधात चकार शब्द देखील उच्चारायची कुणाची छाती नव्हती. आपल्या विरोधात कुणी बोलतंय असा केवळ संशय जरी आला तरी निकोलस त्या माणसांना कोणतीही दया, माया न दाखवता फासावर लटकावत असे आणि त्या माणसाची सगळी संपत्ती, घरदार जप्त करीत असे. त्याच्या या जुलूमाला लोक कंटाळले होते. अखेरीस मात्र कन्वानिशेनस नावाच्या एका नेत्यानं राजा निकोलसचीच जवळची माणसं फोडली आणि राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं.
राजा संतापला. त्याने कन्वानिशेनसला अटक करण्याचा हुकूम दिला. कन्वा भूमिगत झाला. दडून त्याने राजाविरुद्ध मोहीम चालवली. त्याला अनेक नागरिकांचा तसंच राजसत्तेतील काही वरिष्ठ मंत्र्यांचा छुपा पाठिंबा असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी यश देखील मिळत होतं. पण... पण कुणीतरी चुगली केली आणि कन्वा राजाच्या सैनिकांच्या हाती सापडला.
पुढे... पुढे जे व्हायचं तेच झालं. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कन्वाला तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. आठवड्याभरातच त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि कोणत्याही प्रकारच्या साक्षीपुराव्यांची खातरजमा न करता त्याला शिक्षा सुनावण्यात आली. देहदंड...
कन्वाला फाशी देण्याचा दिवस उजाडला. सर्वसामान्य जनतेला पुन्हा बंड करण्याची हिंमत होऊ नये म्हणून जुलमी झार निकोलसने जाहीरपणे भर चौकात फाशी देण्याची तयारी केली होती. शेकडो, हजारो नव्हे, तर लाखो लोक त्या मैदानात जमले. प्रत्येकजण हळहळत होता. मनातल्या मनात जुलमी राजसत्तेविरोधात चडफडत होता.
आणि... आणि ठरल्याप्रणाणे कन्वाला वधस्तंभाकडे आणलं गेलं. त्याचे दोन्ही हात, दोन्ही पाय बांधून त्याला फाशीच्या चबुतऱ्यावर उभं करण्यात आलं. फाशीचा दोर त्याच्या गळ्यात घातला... लाखो लोक श्वास रोखून ते दृष्य पाहत होते. गुपचूप डोळे पुसत होते. एक. दोन तीन... तीन वेळा घंटा वाजल्यानंतर कन्वाच्या पायाखालची फळी दूर लोटण्यात आली. कन्वाच्या मानेभोवतालचा फास आवळला आणि... आणि काय आश्चर्य फासाची दोरी कन्वाच्या वजनानं तुटली आणि गळ्यात फास लटकलेला कन्वा खाली कोसळला. उपस्थित लोकांनी कन्वाचा एकच जयजयकार केला.
त्या काळच्या प्रचलित नियमानुसार जर अशा प्रकारे दोरी तुटली आणि कैदी जिवंत राहिला तर ती देवाची कृपा समजून त्या कैद्यावरचे सर्व गुन्हे माफ केले जात असत.
राजा क्रूर होता. जुलमी होता. पण देवाच्या या नियमापुढे त्याचं काही चालण्यासारखं नव्हतं. शिवाय जमलेले लाखो लोक आता कन्वाच्या नावाचा जयजयकार करत होते. याक्षणी जरा जरी ठिणगी पडली तरी आपला संपूर्ण राजवाडा भस्मसात होईल हे जाणून राजानं कन्वाला सर्व आरोपांपासून निर्दोष मुक्त केलं आणि त्याची सुटका झाल्याचं जाहीर केलं.
झालं. लोक कन्वाच्या नावानं जयघोष करू लागले. कन्वादेखील हर्षभरीत झाला होता. त्यानं त्या ठिकाणी उपस्थित जनतेसमोर भाषण द्यायला सुरुवात केली.
राजसत्तेविरुद्ध आग ओकताना कन्वा म्हणाला ‘काय हा राजा आणि काय याचं राज्य? ज्या राजाला एक मजबूत दोर देखील बनवता येत नाही तो आपल्या प्रजेला न्याय कसा देणार? जनतेचं संरक्षण कसं करणार? हा राजा कुचकामी आहे. हे सरकार कुचकमी आहे. एक साधारण दोर देखील त्यांना बनवता
येत नाही...’
झालं... लोकांना भडकवल्याबद्दल कन्वाला पुन्हा अटक करण्यात आली. दहा मिनिटांपूर्वी देहदंडाच्या शिक्षेतून आणि सर्व आरोपातून सहीसलामत सुटलेल्या कन्वाला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आलं. नव्यानं खटला भरला आणि नव्यानं शिक्षा
सुनावली. देहदंड...
पुन्हा त्याच चौकात फाशीची तयारी करण्यात आली. पुन्हा हजारो लाखो लोक जमले. पण...पण या खेपेला दोर मजबूत करण्याची राजानं सक्त ताकीद देऊन ठेवली होती. अगोदरपासून त्याच्या चाचण्या घेऊन ठेवल्या होत्या. दोर तुटला नाही. कन्वा फासावर लटकला. मेला...
काय गरज होती कन्वाला त्या गर्दीसमोर भाषण करायची? पण नाही. ध्यानीमनी नसताना अचानक जीवदान मिळालेला कन्वा भावनेच्या भरात नको ते बोलून गेला आणि पुन्हा अडकला. फासावर लटकला... मेला...
जर कन्वा गप्प बसला असता तर? तर कदाचित त्याला अनेक अनुयायी मिळाले असते. शांतपणे त्याने राजसत्ता उलथून टाकू शकला असता. पण नाही...संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे.
आत्मनो मुखदोषेण बद्धन्ते शुकसारिका।
बकः तत्र न बद्धन्ते मौनम्
सर्वार्थ साधनम् ।।
भावार्थ : आपल्या वाणीच्या दोषामुळे (बोलण्याच्या स्वभावामुळे) पोपट आणि मैना पिंजऱ्यात ठेवल्या जातात. मौन धारण करून आपल्या कार्यभाग साधणाऱ्या बगळ्यांना मात्र कुणीच पिंजऱ्यात डांबत नाही. म्हणूनच सर्व मौन हे आपला कार्यभाग साधून घेण्याचं सर्वोत्कृष्ट साधन आहे.
या श्लोकात दडलेला गर्भितार्थ जर ध्यानात घेतला तर आपल्याला आढळून येईल की अति बडबड करणाऱ्या माणसांना समाजात, नातेवाइकांत, मित्रमंडळींमध्ये कुणी फारशी किंमत देत नाही. कुणी त्यांच्या बोलण्याला गंभीरपणे घेत नाही. तोंडावर जरी लोक त्यांना काही बोलत नसले तरी पाठीमागे मात्र टिंगलच करतात.
समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोध ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या वाचाळवीरांना उद्देशून एक शब्द वापरला आहे. ‘पढतमूर्ख’
समर्थ म्हणतात, वक्ता अधिकारेवीण। वगतृत्वाचाा करी सीण। वचन जयाचे कठीण । तो येक पढतमूर्ख ।। श्रोता बहुश्रुतपणे । वक्तयासा आणी उणे । वाचाळपणाचेनि गुणे । तो येक पढतमूर्ख ।
अर्थ: योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि कोणी ऐकत नसूनही बोलण्याचे विनाकारण श्रम घेतो तसंच ज्याचे बोलणे कठोर असते तो पढतमूर्ख होय. थोडंफार शिकलेला पण बहुश्रुत असलेला एखादा श्रोता समोरच्या बोलणाऱ्याच्या बोलण्यात विनाकारण अडथळा आणून स्वतःची टिमकी वाजवतो तो पढतमूर्ख होय.
अती बोलण्याचे अनेकदा दुष्परिणाम झाल्याची अनेक उदाहरणं आपण पहातो. बोलण्याचा पहिला नियम म्हणजे बोलूच नये.गरज असेल तरच बोलावं. तोंड आहे. बोलता येतं म्हणून विनाकारण बोलूच नये.