- गोष्ट लहान, अर्थ महान; शिल्पा अष्टमकर
विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास यश सहज मिळू शकते. अनेक विद्यार्थी तासनतास अभ्यास करतात, पण योग्य नियोजन नसल्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे “किती वेळ अभ्यास केला?” यापेक्षा “कसा अभ्यास केला?” हे अधिक महत्त्वाचे ठरते.
१. अभ्यासाचे नियोजन करा अभ्यास सुरू करण्यापूर्वी वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. कोणता विषय किती वेळ शिकायचा, कोणत्या वेळी पुनरावृत्ती करायची याचे नियोजन असावे. नियोजनामुळे अभ्यासात शिस्त येते आणि वेळेचा अपव्यय टळतो.
२. शांत व स्वच्छ वातावरण निवडा अभ्यास करताना आजूबाजूचे वातावरण शांत असावे. मोबाईल, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे. स्वच्छ व नीटनेटकी जागा मन एकाग्र ठेवण्यास मदत करते.
३. समजून अभ्यास करा फक्त पाठांतर करण्यापेक्षा विषय समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा मुद्दा समजला, तर तो दीर्घकाळ लक्षात राहतो. शंका असल्यास शिक्षकांना किंवा मित्रांना विचारावे.
४. नियमित पुनरावृत्ती करा एकदा शिकलेला अभ्यास विसरू नये म्हणून पुनरावृत्ती आवश्यक आहे. दररोज थोडा वेळ जुन्या अभ्यासासाठी द्यावा. पुनरावृत्तीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षा सोपी वाटते.
५. स्वतःच्या नोट्स तयार करा महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या भाषेत लिहून ठेवावेत. अशा नोट्स परीक्षेपूर्वी फार उपयोगी पडतात. लिहून अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते.
६. आरोग्याकडे लक्ष द्या योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे अभ्यासासाठी आवश्यक आहे. शरीर निरोगी असेल, तर मनही ताजेतवाने राहते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होते.
७. सकारात्मक विचार ठेवा “मी हे करू शकतो” हा आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. अपयश आले तरी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावेत. मेहनत आणि चिकाटी यामुळेच यश मिळते. अभ्यास हा ओझे नसून ज्ञान मिळवण्याचा सुंदर मार्ग आहे. योग्य नियोजन, नियमितता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने कोणताही विद्यार्थी यश संपादन करू शकतो. “आजचा अभ्यास उद्यावर ढकलू नका” हे लक्षात ठेवून सातत्याने प्रयत्न करणे हाच यशाचा खरा मंत्र आहे.
अभ्यास कसा करावा (How to Study) असाध्य ते साध्य करता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। मुलांना अभ्यास सोडून बाकी सर्व करावेसे वाटते. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात गैरसमज किंवा अपसमज असतात. त्यांना अभ्यास म्हणजे पाठांतर असे वाटते. काही मुलांना अभ्यास म्हणजे वाचन असे वाटते. विषयांचे मर्म जाणण्यासाठी केलेला सराव म्हणजे अभ्यास. ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न किंवा एखाद्या विषयाचा काळजीपूर्वक घेतलेला शोध म्हणजे अभ्यास. अभ्यासाचा व्यवहारात उपयोग करून असाध्य गोष्टी साध्य करता येतात. एखाद्या विषयाच्या अध्ययनाचा मनापासून केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास. विषयांची आवड असेल, ध्येयाचा ध्यास असेल, मनात ऊर्मी असेल तर अभ्यासाचा कंटाळा येत नाही. ती आनंदाची क्रिया बनते. अभ्यास करतानाच आनंद व समाधान मिळते. व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकरिता अभ्यासाची आवश्यकता आहे. न समजता केल्यास अभ्यास अवघड वाटतो. विषय समजावून घेऊन अभ्यास केला पाहिजे.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण । असे तुकाराम महाराज म्हणतात. मन शांत करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी अभ्यासाला बसल्यानंतर २० वेळा ॐ चे उच्चारण करावे. दीर्घ श्वास घ्यावा व तो श्वास सोडताना ॐ चे उच्चारण करावे. ॐ कार करत असताना तयार होणारी स्पंदने मन एकाग्र करतात. एकाग्र चित्ताने केलेला अभ्यास स्मरणात राहतो व परीक्षेवेळी व आवश्यक तेव्हा आठवतो.
अभ्यासामध्ये खालील गोष्टी आवश्यक असतात. (१) वाचन (२) लेखन (३) मनन (४) स्मरण (५) चर्चा (६) प्रश्नपत्रिका सोडविणे (७) इतरांना समजावून सांगणे (१) वाचन : अभ्यासाचे प्रमुख साधन म्हणजे वाचन होय. वाचन शांत चित्ताने व मनःपूर्वक केले पाहिजे. (२) लेखन : मुद्दे लिहिण्यासाठी, टिपणे काढण्यासाठी सुटे कागद किंवा स्वतंत्र वही वापरावी. (३) मनन : स्मरणासाठी ३०% वाचन, तर ७० % मनन लागते. मनन म्हणजे वाचलेला, समजलेला भाग स्वतःच्या भाषेत मांडता येणे. (४) स्मरण : आपण जे अभ्यासले आहे ते कालांतराने आठवणे म्हणजे स्मरण होय. परीक्षेत स्मरणाची आवश्यकता असते. (५) चर्चा : चर्चेमुळे आत्मविश्वास, नेतृत्व, तार्किक कौशल्य, स्वमत प्रतिपादन, परमत खंडन, उपक्रमशीलता इ. गुण व सुप्तगुण तपासता येतात. ( ६) प्रश्नपत्रिका सोडवणे: प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अभ्यास पूर्ण करावा लागतो. (७) इतरांना समजावून सांगणे : आपण केलेला अभ्यास इतरांना सांगावा त्यामुळे ज्ञान पक्के होते. ज्ञान दिल्यामुळे ते कमी होत नाही, उलट वाढतच राहते.






