Saturday, May 30, 2026

समर्थ रामदास

समर्थ रामदास
तोंवरी तोंवरी डगमगीना कदा । देहाची आपद झाली नाहीं ॥१॥ तोंवरी तोंवरी परमार्थ स्वयंभ । जंव पोटीं लोभ आला नाहीं ॥२॥ तोंवरी तोंवरी अत्यंत सद्भाव । विशेषें वैभव आलें नाहीं ॥३॥ तोंवरी तोंवरी सांगे निरभिमान । देहाशीं अभिमान झाला नाहीं ॥४॥ तोंवरी तोंवरी धीरत्वाची मात । प्रपंची आघात झाला नाहीं ॥५॥ रामदास म्हणे अवघेची गाबाळी । ऐसा विरळा बळी धैर्यवंत
"शरीरावर जोपर्यंत काही आपत्ती, संकट येत नाही, शरीर आरामात वा सुखात आहे अशी परिस्थती असेतो, लोक मोठमोठ्या गप्पा मारतात. जोवर श्रीमंती वा वैभव प्राप्त होत नाही, तोवर लोक नीतीमत्तेच्या गोष्टी बोलतात. सर्वांशी समानतेने वागावे. प्रेमाचे वर्तन करावे असे उपदेश करतात. माणसाने अभिमान बाळगू नये, निरभिमानी असावे असे सांगणारा माणूस वैभव, यश प्राप्त झाल्यावर मात्र अभिमानाने अंध होऊन जातो. धैर्याच्या मोठमोठ्या बाता मारणारे लोक संकटाच्या वेळी परिस्थितीपासून पळ काढतांना दिसतात. समर्थ रामदास म्हणतात, "परमार्थावर बोलणारे लोक लोभापासून स्वत:ला अलिप्त ठेवू शकत नाहीत. म्हणून सगळेच गावाळी किंवा गबाळ वाटतात. लोभ, मोह यावर मात करून परमार्थाची अंतिम पायरी पार करणारा एखादाच निघतो. तो खरा धैर्यवान. अध्यात्माची ही उंची फक्त संतांनीच गाठली होती. अशा प्रकारच्या अभंगरचना अनेक संतांनी केल्या आहेत. याच प्रकारची संत नामदेव यांची रचना प्रसिद्ध आहे, ते म्हणतात, तोवरी रे तोवरी वैराग्याचे ठाण । जंव कामिनी कटाक्ष बाण लागले नाही ।।
वरवर वैराग्याचे सोंग घेणाऱ्या साधूंवर नामदेवांनी टीकेचा प्रहार केला आहे. या तथाकथित साधूंच्या वैराग्याचे बळ कुठपर्यंत टिकते? जोवर एखाद्या सुंदर कामिनीने आपल्या नेत्रांच्या बाणांनी त्यांना घायाळ केले नाही, तोपर्यंत स्त्रिया एका नजरेच्या कटाक्षासरशी त्यांचा वैराग्याचा रंग पूर्ण उत्तरतो आणि त्यांचे वैराग्याचे उसने सोंग पुरते उघडे पडते. संतांच्या विचारांचा धागा सारखाच असतो. सर्व संतांनी लोभ, मोह, अहंकार, ढोंग यावर कठोरपणे टीका केली आहे. संतांचे समाजनिरीक्षण सूक्ष्म होते. मानवी स्वभावधर्माचा त्यांचा चांगला अभ्यास होता. नेमकेपणा, नेटकेपणा आणि विवेकसंपन्न विचारसरणी असणाऱ्या समर्थांनी अशा ढोंगी लोकांना गाबाळी किंवा गबाळ म्हटले ते अगदी यथार्थ आहे. ढोग हा अध्यात्म वाटेवरचा मोठा अडथळा आहे हे सूत्र समर्थांनी प्रतिपादन केले आहे.   ___डॉ. देविदास पोटे
Comments
Add Comment