Thursday, May 28, 2026

'Mardini' Marathi Movie : 'आई तारी त्याला कोण मारी'; प्रार्थना बेहेरेचा ‘मर्दिनी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'Mardini' Marathi Movie : 'आई तारी त्याला कोण मारी'; प्रार्थना बेहेरेचा ‘मर्दिनी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ (Mardini) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर (Teaser) प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये प्रार्थना एका दमदार आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या लेकरावर संकट ओढवल्यानंतर एक सामान्य आई कोणत्या टोकाला जाऊ शकते आणि अन्यायाविरुद्ध कशा प्रकारे रौद्र रूप धारण करू शकते, याची अंगावर काटा आणणारी झलक या टीझरमधून पाहायला मिळते.

‘मर्दिनी’च्या टीझरमध्ये प्रार्थना बेहेरेचा अभिनय प्रेक्षकांना चकित करणारा ठरत आहे. मातृत्व, संघर्ष आणि आईच्या अथांग प्रेमाची ताकद या टीझरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी बालकलाकार मायरा वैकुळ, अभिनेता अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, टीझरमध्ये कलाकार आणि चित्रपटाच्या मुख्य टीमची ओळख करून देताना प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लावण्यात आले आहे. दिग्दर्शक, निर्माता, सहनिर्माते तसेच कलाकारांच्या नावासोबत वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव दाखवण्यात आल्याने या संकल्पनेचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. महिलाशक्ती आणि मातृत्वाला दिलेला हा वेगळा सन्मान प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरत आहे. अजय मयेकर दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट असून, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी भावना, थरार आणि नारीशक्तीचा प्रभावी संगम साधल्याचं टीझरमधून दिसून येत आहे.  दिप्ती तळपदे आणि अभिनेता श्रेयस तळपदे  निर्मित ‘मर्दिनी’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रार्थना बेहेरेच्या जबरदस्त मेकओव्हरचे आणि तिच्या दमदार अभिनयाचे जोरदार कौतुक केले जात आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आईची ही कथा प्रेक्षकांना भावनिक आणि अंतर्मुख करणारा अनुभव देणार असल्याचं बोललं जात आहे. नारीशक्तीच्या अथांग सामर्थ्याला सलाम करणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट (Film) येत्या ३ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित (Release) होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >