मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय आणि प्रमुख स्थानकांवर मिळणारे लोकप्रिय स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ १ जून २०२६ पासून महाग होणार आहेत. दररोज लाखो प्रवाशांची भूक भागवणारा वडापाव, समोसा, भेळ यांसारख्या पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नियमित रेल्वे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्या दररचनेनुसार, सध्या १३ रुपयांना मिळणारा वडापाव आता २० रुपयांना विकला जाणार आहे. त्याचप्रमाणे १२ रुपयांचा समोसा देखील २० रुपयांना मिळेल. रगडा पाव आणि उसळ पाव या लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या कॉम्बोच्या (Combo) किमतीतही वाढ करण्यात आली असून त्यांचा दर २० रुपयांवरून २५ रुपये करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर एका साध्या पावाची किंमतही ३ रुपयांवरून थेट ५ रुपये करण्यात आली आहे. चटणी भेळ आणि सुका भेळ यांच्याही दरात वाढ करण्यात आली असून त्याचा परिणाम रोजच्या प्रवाशांवर होणार आहे.
मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी म्हाडाची (MHADA Lottery 2026) घरांची सोडत मोठी संधी ठरत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण ...
दरवाढीसोबतच रेल्वे प्रशासन काही खाद्यपदार्थांच्या प्रमाणातही बदल करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय संत्रा, मोसंबी आणि सफरचंदाच्या रसासह विविध पेयांच्या किमतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे सध्या तरी सोडाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने २०२१ मध्ये खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये सुधारणा केल्यानंतर २०२५ मध्ये स्टेशनवरील स्टॉल्ससाठी नवी दररचना लागू केली होती. आता मध्य रेल्वेनेही आपल्या स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी स्लश ड्रिंक्स (Slush Drinks), क्रीम डोनट्स (Cream Donuts), सूप (Soup), डोसा (Dosa) आणि नूडल्स (Noodles) यांसारखे अनेक नवीन खाद्यपदार्थही स्टेशनवरील (Station) स्टॉल्सवर (Stalls) उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मुंबई : प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट 'देऊळ बंद २'(Deool Band 2) २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी ...
मात्र, या निर्णयावर केटरिंग (Catering) संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, रेल्वे प्रशासन स्वस्त आणि स्थानिक खाद्यपदार्थांना दुय्यम स्थान देत असून महागड्या ब्रँडेड (Branded) उत्पादनांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेले परवडणारे खाद्यपदार्थ हळूहळू कमी होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.
केटरिंग संघटनांच्या मते, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवास करणाऱ्या ४० टक्क्यांहून अधिक प्रवाशांचा समावेश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न मध्यमवर्गीय गटात होतो. हे प्रवासी लांब पल्ल्याच्या दैनंदिन प्रवासादरम्यान स्थानकांवर उपलब्ध असलेल्या स्वस्त आणि परवडणाऱ्या खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.





