Karnataka Accident News : शिंपले गोळा करताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील १० जणांचा खाडीत बुडून मृत्यू

कर्नाटक : कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात रविवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शिराळी येथील तट्टीहक्कू परिसरातील वेंकटापूर खाडीत शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील १४ जणांवर काळाने झडप घातली. समुद्राच्या भरतीमुळे खाडीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने झालेल्या या भीषण दुर्घटनेत १० जणांचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. तीन महिलांना बचाव पथकांनी वाचवले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शिराळीतील शारदहोळे परिसरात राहणाऱ्या नाईक कुटुंबातील १४ सदस्य रविवारी सकाळी वेंकटापूर खाडीत पारंपरिक पद्धतीने शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. स्थानिक भागातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे अशा प्रकारे खाडीत जाऊन शिंपले गोळा करण्याचे काम करतात. मात्र, यावेळी भरतीमुळे खाडीतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. परतीच्या मार्गावर काही जण खोल पाण्यात अडकले आणि क्षणार्धात मोठी दुर्घटना घडली.



या दुर्घटनेत आठ महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर महादेव जट्टप्पा नाईक हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बचावलेल्या तीन महिलांना तातडीने उपचारासाठी उडपी आणि मणिपाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लक्ष्मी मादेव नाईक (३८), लक्ष्मी महादेव नाईक (४१), लक्ष्मी शिवराम नाईक (३९), उमेश मंजनाथ नाईक (४२), मास्तम्मा मंजुनाथ नाईक (४३), लक्ष्मी अण्णप्पा नाईक (४४), ज्योती नाईक (३०), मालती नाईक (४९), मंजम्मा गोत्ता नाईक (४०) आणि नागरत्ना परमेश्वर नाईक (३८) यांचा समावेश आहे.



तर या दुर्घटनेतून बचावलेल्या मादेवी मंजुनाथ नाईक (६०), लता जगदीश नाईक (३८) आणि नागरत्ना ईश्वर नाईक (४०) यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खाडीत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर तालुका रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण भटकळ तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


भरतीचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना?


प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात भरती सुरू झाल्यानंतर खाडीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. खाड्यांमध्ये भरती-ओहोटीचा परिणाम अतिशय वेगाने जाणवतो. पाण्याची पातळी काही मिनिटांत वाढू शकते. शिंपले गोळा करण्यात गुंतलेल्या कुटुंबीयांना वाढत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते परतताना अडचणीत सापडले. काही जण खोल पाण्यात वाहून गेले आणि ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक भागांमध्ये पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. तसेच भरती-ओहोटीची माहिती देणारे इशारा फलक, सुरक्षित वेळापत्रक आणि सतर्कता उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



">खाडी परिसरात शिंपले गोळा करणे, मासेमारी करणे किंवा पाण्यात उतरून कोणतेही काम करताना भरती-ओहोटीच्या वेळांची अचूक माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते. भटकळमधील वेंकटापूर परिसरातील खाडीवरही समुद्राच्या भरतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने पाण्याची पातळी अचानक वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे अशा भागांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags
karnatakacreekkarnataka accidentAccident
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र