Saturday, October 10, 2026

Modi : 'पंतप्रधान मोदींचे काम पुस्तकात मांडणे कठीण'

मोदींनी १२ वर्षांत भारताला आत्मनिर्भर बनवले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेले अभूतपूर्व परिवर्तन आणि देशाची झालेली प्रगती इतकी अथांग आहे की, हे सर्व कार्य केवळ एका पुस्तकात किंवा भाषणात मांडणे अशक्य आहे. मोदींनी भारताला स्वाभिमानी आणि 'आत्मनिर्भर भारत' म्हणून जागतिक पातळीवर उभे केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत ‘राष्ट्रनिर्माणाची तप:पूर्ती’ या विशेष संग्राह्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विकासाचा आलेख मांडत आधीच्या यूपीए सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत सर्वात महत्त्वाची वाटचाल सामाजिक क्षेत्रात केली आहे. गरिबांना घरगुती गॅस, हक्काची घरे आणि शौचालये उपलब्ध करून देत मोदीजींनी नेहमीच गरीब केंद्रित अजेंडा राबवला. याच धोरणामुळे अवघ्या १० वर्षांत भारताने तब्बल २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले आहे. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले आणि हे आज संपूर्ण जगानेही मान्य केले आहे."

भारताने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी मांडली. "२०१३ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता. आज तो तब्बल ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या दहा-बारा वर्षांत देशाचा जीडीपी तीन पटीने वाढला आहे. मोदीजींनी रचलेल्या या भक्कम पायामुळेच भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने पुढे जात आहे," असे फडणवीस म्हणाले. यूपीएच्या काळात 'अनुदानप्रणित' अर्थव्यवस्था

"आधीच्या यूपीए सरकारच्या काळात केवळ अनुदानावर लोकांनी जगले पाहिजे, असे धोरण होते. आम्ही नव्या संधी निर्माण करणार नाही आणि पायाभूत सुविधांवर खर्च करणार नाही, अशीच त्या वेळच्या राज्यकर्त्यांची मानसिकता होती. या अनुदानप्रणित अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आणि विकास खुंटला. याउलट मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकास करत देशात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण केल्या," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >