Sunday, June 28, 2026

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करावीत,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉर रुम अंतर्गत आरोग्य विभागाच्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा निर्माण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी निर्धारित वेळेत खर्च होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे. सुरुवातीच्या काळात कामांमध्ये विलंब होत होता; मात्र आता जिल्ह्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. काही जिल्ह्यांची प्रगती तुलनेने कमी असली तरी सर्व जिल्ह्यांनी आता निश्चित केलेल्या वेळापत्रकात काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. प्रलंबित प्रकल्पांमध्ये विभागांमधील समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी शासन म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राला कमी प्राधान्याचे क्षेत्र समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे. शासकीय दवाखाने म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्ट ही नागरिकांची धारणा बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. मॉड्युलर तंत्रज्ञानामुळे दर्जेदार आणि वेळेत काम शक्य होत असल्याने अधिकाऱ्यांनी कल्पकतेने काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पुण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा चांगल्या उपक्रमांचा इतर ठिकाणीही अवलंब व्हायला हवा. नागरिकांना शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये गुणवत्ता जाणवली पाहिजे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारून लक्ष घालावे.वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमधील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या मुदतींची नोंद करण्यात आली आहे. पुढील वॉर रूम बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार असून अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे आवश्यक राहील.

प्रश्न प्रलंबित ठेवू नका, पाठपुरावा वाढवा, असे स्पष्ट निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एखादा प्रश्न आपल्या स्तरावर सुटत नसेल तर विभाग प्रमुख, सचिव, मुख्य सचिव, मंत्री किंवा मुख्यमंत्री स्तरापर्यंत विषय मांडावा; मात्र काम पूर्ण होईपर्यंत शांत बसू नये. सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यास कोणतीही समस्या सुटू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सर्व्हायकल कर्करोग प्रतिबंधासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास दहा लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरावर पालकांची संमती घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवावी आणि लक्ष्य वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यात नवीन तेरा वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या महाविद्यालयांच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामे वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्यात यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >