रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश
रुग्णालयांमधील कामांवर सहायक आयुक्तांना भेटी देत लक्ष देण्याच्या सूचना
मुंबई :दवाखाने व रुग्णालयांच्या इमारती आकर्षक, एकसमान रंगसंगतीने उठावदार दिसाव्यात, परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीमुळे या आरोग्य संस्थांचे दर्जेदार स्वरूप कायम राखले जावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शनिवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले. प्रशासकीय विभागांच्या (वॉर्ड) सहायक आयुक्तांनी विविध आरोग्य संस्थांना स्वयंप्रेरणेने भेट देऊन परिसर स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, दुरुस्तीची कामे, रंगसंगती आणि नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असेही निर्देश भिडे यांनी यावेळी दिले. आता आता दवाखाने, रुग्णालये आदी परिसर फेरीवाला मुक्त होवू स्वच्छ आणि सुंदर दिसतील अशी आशा मुंबईकरांनी बाळगायला हरकत नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवरी १६ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.
मुंबईकरांच्या आरोग्यसेवेसाठी मुंबई महानगरपालिकेची सुमारे ५०० हून अधिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे, विशेषोपचार रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटींहून अधिक नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिकता आणि वैद्यकीय सेवांची गुणवत्ता सातत्याने अधिक सक्षम व उंचावत आहे. मात्र, उत्कृष्ट आरोग्यसेवेसोबतच या सर्व आरोग्य संस्थांचा परिसरही स्वच्छ, अतिक्रमणमुक्त आणि नागरिकांच्या दैनंदिन वावरासाठी सुसज्ज असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, आरोग्य संस्थांच्या इमारतींचे संरचनात्मक सुरक्षा लेखापरीक्षण, आवश्यक दुरुस्ती आणि नियमित देखभाल वेळोवेळी करून आरोग्य संस्थांची गुणवत्ता व विश्वासार्हता कायम राखावी. महानगरपालिकेच्या गरजेनुसार सुरक्षा व गृहव्यवस्थापन (हाऊसकीपिंग) कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी. यासोबतच आरोग्य संस्थांचे दिशादर्शक फलक, सुशोभीकरण आणि एकूण सादरीकरण अधिक आकर्षक, सुबक व नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. संबंधित विभागांच्या सहायक आयुक्तांनी आरोग्य संस्थांना नियमितपणे भेट द्यावी. विभागांच्या सहायक अभियंता (परिरक्षण) यांनी आरोग्य संस्थांच्या देखभाल, दुरुस्ती व आवश्यक परिरक्षण कामांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देशही भिडे यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण १४ हजार ६५३ रुग्णखाटा उपलब्ध असून, नवीन रुग्णालयांच्या उभारणीनंतर आणखी सुमारे ४ हजार ५५६ रुग्णखाटांची भर पडणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत सुमारे २१ हजार २९९ कायम कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, मुंबईकरांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी करताना केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे, तर आरोग्य संस्थांमधील मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि परिसर व्यवस्थापन यांनाही तितकेच प्राधान्य देणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधांच्या परिसरातील अतिक्रमणे व विविध अडथळे दूर करून नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ वातावरण निर्माण करण्यात यावे. अखंडित पाणी व वीजपुरवठा सुनिश्चित करण्याबरोबरच अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. रुग्णालये व दवाखान्यांतील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, देखभाल व निर्जंतुकीकरण करून परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी राखावा. रुग्ण, कर्मचारी व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच, परिसरातील दृश्यमानता व सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी वृक्षांच्या फांद्यांची नियमित छाटणी करावी,असेही निर्देश दिले.






