Saturday, May 16, 2026

Sharad Pawar And Praful Patel : प्रफुल पटेल अन् शरद पवारांची 'सिल्व्हर ओक'वर गुप्तभेट?

Sharad Pawar And Praful Patel : प्रफुल पटेल अन् शरद पवारांची 'सिल्व्हर ओक'वर गुप्तभेट?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गोटात सध्या अंतर्गत नाराजीनाट्य पेटलेले असतानाच, राजकीय वर्तुळाला चक्रावून टाकणारी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १२ मे च्या रात्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन गुप्तभेट घेतल्याचे समोर आले आहे. सुनील तटकरे यांच्या भेटीची चर्चा याआधी झाली असली, तरी त्यांच्या आधीच प्रफुल पटेल हे अत्यंत गुप्तपणे शरद पवारांच्या दरबारात हजर होते आणि तिथे तिन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

राष्ट्रवादीची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती गेल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला (साईडलाईन) सारण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांचे नाव गायब झाल्याची कुजबुज आहे, तर तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची शरद पवारांसोबत झालेली ही गुप्तभेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नव्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत आहे.

१२ मे रोजी आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेही गुवाहाटीला गेले होते. मात्र, मुंबईला परतताना सुनेत्रा पवार यांनी आपल्याच पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना टाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातून येणे पसंत केले. यामुळे दुखावलेल्या प्रफुल पटेल यांनी तातडीने शरद पवारांची वेळ मागितली. पटेल पवारांशी चर्चा करत असतानाच ऐनवेळी सुनील तटकरेही तेथे पोहोचल्याने 'सिल्व्हर ओक'वर तिन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पार्थ पवारांची तक्रार?

अजितदादांच्या पश्चात त्यांचे पुत्र पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्ष हाताळत आहेत, त्याबद्दल जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केली आहे. "आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अजितदादा असताना असे कधी घडत नव्हते. शरद पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी," अशी आग्रही मागणी या नेत्यांनी शरद पवारांकडे केल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून आधीच वाद निर्माण झाला असताना, आता पार्थ पवारांविरोधातील या तक्रारीमुळे पक्षात सारे काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >