Friday, May 15, 2026

Dr. Anand Nadkarni Passes Away : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

Dr. Anand Nadkarni Passes Away : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

मुंबई : मानवी मनाचे गुंतागुंतीचे पेच, मानसिक आजार सर्वसामान्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी (१५ मे) रोजी पहाटे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. मार्च महिन्यात त्यांना पॅन्क्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते. ६ मे रोजी मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, १३ मेच्या रात्री त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर अॅस्पिरेशन न्यूमोनिया झाला. त्याच रात्री आतड्याला पडलेल्या छिद्रामुळे त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, मात्र नंतर त्यांचा रक्तदाब अचानक घसरला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखेर शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी डॉ. नाडकर्णी यांनी आयुष्यभर कार्य केले. मानसिक आजार हा शारीरिक आजारांइतकाच सामान्य विषय आहे, हे त्यांनी आपल्या लेखन, व्याख्यानं आणि समुपदेशनातून प्रभावीपणे समाजासमोर मांडलं. त्यामुळेच त्यांना ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळखलं जात होतं.

डॉ. नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मानसशास्त्रासोबतच साहित्य, नाटक आणि सामाजिक विषयांवरही विपुल लेखन केलं. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ यांसारखी व्यावसायिक नाटकं त्यांनी लिहिली, तर ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

">मनोविकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (IPH) या संस्थेची स्थापना केली. मानसिक आरोग्य, समुपदेशन, कुटुंबव्यवस्था आणि स्व-विकास या क्षेत्रांत संस्थेमार्फत त्यांनी मोठं काम उभं केलं. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला आणि संवाद यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा