Mayor Ritu Tawde : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालेसफाईसह रस्ते कामांची महापौरांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. ३१ मे २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी अजूनही नाल्यांमध्ये गाळ, कचरा साचलेला आहे, पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचा सध्याचा वेग वाढवून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करायला हवीत. मात्र कामांचा वेग वाढविताना गुणवत्तेमध्ये तफावत होता कामा नये, अशा सूचना महापौर रितू तावडे यांनी दिल्या.





पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून महानगरपालिकेकडून नदी, नाल्यांतील गाळ काढण्याची कामे तसेच रस्त्यांची कामे संपूर्ण मुंबई महानगरात वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील मालाड (पश्चिम) येथील ऑर्लेम चर्च मार्ग मार्वे रस्ता, डी मार्ट जवळील रामचंद्र नाला, गोरेगांव (पश्चिम) येथे मेगा मॉलजवळ ओशिवरा नदी, जुहू येथे इर्ला नाला आणि संत कबीर मार्ग, खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्राजवळ एसएनडीटी नाला आणि वांद्रे (पूर्व) परिसरातील वाकोला नदी तसेच हरणे गुरुजी मार्ग येथील कामांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी १४ मे २०२६ रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी विविध निर्देश दिले. ‘पी पूर्व’ व ‘पी पश्चिम’ विभाग समितीचे अध्यक्ष हैदर अली असलम शेख, ‘के पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड, नगरसेवक दीपक कोतेकर, नगरसेवक चिंतामणी निवाटे, उप आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी, सहायक आयुक्त (एच पश्चिम) दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त (एच पूर्व) मृदुला अंडे, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) रमाकांत मोरे, कार्यकारी अभियंता (रस्ते) अभिजीत इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



मालाड पश्चिम परिसरातील मालवणी नाला आणि खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्राजवळ एसएनडीटी नाल्याची स्वच्छता सुरू असली तरी हाताशी असलेला कालावधी आणि उर्वरित स्वच्छतेची आवश्यकता पाहता दोन्ही ठिकाणी कामांचा वेग वाढविण्याचे निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले. तसेच या दोन्ही नाल्यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा आकस्मिक पाहणी (सरप्राईज व्हिजीट) करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जुहू येथील इर्ला नाल्याच्या पाहणीप्रसंगी स्थानिक नागरिकांशी महापौरांनी संवाद साधला. या नाल्याच्या एका बाजूला संरक्षक भिंतीचे बांधकाम ढासळले आहे. या ठिकाणी अनेक नागरिक सकाळी सायकलिंगसाठी येतात. व्यायामासाठी येतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या भिंतीची दुरुस्ती करण्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशा सूचना महापौर श्रीमती तावडे यांनी दिल्या. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधत दैनंदिन कामकाज कसे चालते, याबाबतही माहिती जाणून घेतली.



खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्रालाही महापौरांनी भेट दिली. याठिकाणची संगणकीय प्रणाली, नियंत्रण कक्ष, ट्रॅश बूममार्फत कचऱ्याच्या वर्गीकरणाची त्यांनी पाहणी केली. समुद्राच्या भरती-ओहोटीप्रसंगी पूर नियंत्रण द्वार (फ्लड कंट्रोल गेट) कशाप्रकारे काम करते, याचीही त्यांनी अभियंत्यांकडून माहिती घेतली. याच दौऱ्यात महापौर रितू तावडे यांनी मालाड (पश्चिम) येथील ऑर्लेम चर्च मार्ग, मार्वे रस्ता, जुहू येथे संत कबीर मार्ग आणि वांद्रे (पूर्व) परिसरातील हरणे गुरुजी मार्गांची पाहणी केली. सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची काळजी घ्यावी. तसेच झाडांची मुळे उघडी होवू नयेत म्हणून त्यांच्या बुंध्याभोवती माती टाकण्याचे निर्देश महापौर तावडे यांनी दिले. रस्त्यांखालून गेलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील जाळ्या तसेच झाकणांचीही महापौरांनी पाहणी केली. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, तसेच सिमेंट काँक्रिटीकरणावेळी स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.



या पाहणीदौऱ्यात महापौर रितू तावडे यांनी मालाड पश्चिम परिसरातील महाराणा प्रताप क्रीडांगणालाही भेट दिली. माजी नगरसेविका जया तिवाना यांन या क्रीडांगण विकासाबाबतची माहिती दिली. या क्रीडांगणात मुलांना खेळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचे महापौरांनी कौतुक केले. तसेच मुंबईतील मोकळ्या भूखंडांवरही अशाप्रकारे क्रीडांगण उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रीडांगणाच्या परिसरातील असलेल्या मोकळ्या जागेवर वाफे तयार करून शहरी शेतीची संकल्पना राबविता येईल, अशी सूचनादेखील महापौरांनी केली.

Comments
Add Comment

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम