Tuesday, May 12, 2026

Hingoli : जमिनीतून गूढ आवाज अन् ३.४ रिश्टर स्केलचे हादरे; हिंगोली पुन्हा हादरलं!

Hingoli : जमिनीतून गूढ आवाज अन् ३.४ रिश्टर स्केलचे हादरे; हिंगोली पुन्हा हादरलं!

हिंगोली : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रभरात भूगर्भातून येणाऱ्या आवाजांचे सत्र सुरूच आहे. आता हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या या प्रकोपाचा सामना करावा लागला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी हिंगोलीच्या जमिनीला जोरदार हादरे बसले. केवळ जमीन हादरली नाही, तर त्यासोबतच भूगर्भातून आलेला एक भीषण आणि गूढ आवाज ऐकून ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी मोजण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.

वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये धावपळ

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, सिरळी, डोणवाडा आणि खांबाळा या गावांपाशी होता. सायंकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक घरात कामात व्यस्त होते, तर काही विश्रांती घेत होते; अशा वेळी अचानक आलेल्या धक्क्यामुळे लोकांनी भीतीने घराबाहेर मोकळ्या मैदानात धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा घरांची पडझड झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

याआधी सुद्धा नांदेड, पालघर, पंढरपूरमध्ये धक्के जाणवले

महाराष्ट्रातील भूकंपाचा हा सिलसिला केवळ हिंगोलीपुरता मर्यादित नाही. याआधी पालघरमधील तारापूर परिसरात भूकंपाचे सत्र कायम असतेच, पण अलीकडेच फेब्रुवारी २०२६ मध्ये नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातही अशाच प्रकारची खळबळ उडाली होती. हिबट, कोळगाव आणि धामणगाव सारख्या ७-८ गावांमध्ये दुपारी ३:१५ च्या सुमारास जमिनीतून आवाज येत हादरे बसले होते. त्यानंतर विठुरायाची नगरी पंढरपूरमध्येही जमिनीखालून गूढ आवाजांचे अनुभव नागरिकांनी घेतले होते. राज्याच्या विविध भागांत एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे भूगर्भशास्त्रज्ञांसमोरही आता नवीन संशोधनाचे आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >