Thursday, May 7, 2026

बारामतीत 'दादां'ची परंपरा आता 'जय'च्या हाती

बारामतीत 'दादां'ची परंपरा आता 'जय'च्या हाती

पवारांच्या 'जनता दरबारा'ला पुन्हा गजबज; अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत जय पवारांचा लोकांशी थेट संवाद

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता पवार कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. अजितदादांची अत्यंत लोकप्रिय असलेली 'जनता दरबारा'ची परंपरा आता त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पुढे नेण्यास सुरुवात केली असून, बारामतीत आता नव्या 'दादां'ची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवार हे बारामतीतील नागरिकांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्यासाठी नियमितपणे जनता दरबार भरवत असत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश देऊन सामान्यांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली ही त्यांची ओळख होती. दादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला, तरी जनसंपर्काचा हा महत्त्वाचा दुवा काहीसा विरळ झाला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी जय पवार आता दर गुरुवारी बारामती येथील 'सहयोग' या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत.

या जनता दरबारात बारामतीसह आसपासच्या तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी घेऊन येत आहेत. जय पवार नुसते समस्या ऐकूनच घेत नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा 'सहयोग'वर नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय पुनरुत्थानाचे संकेत?

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवार यांनी आपला सामाजिक आणि राजकीय वावर वाढवला आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि आता थेट 'जनता दरबार' यामुळे जय पवार हे भविष्यात बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment