Wednesday, May 6, 2026

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना अथवा आवश्यक परवानगी न देता तात्काळ कामावरून कमी करण्यात आल्याच्या प्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

आज विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कंपनी आस्थापना, कामगार संघटना तसेच कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कामगारांच्या सेवासमाप्तीची प्रक्रिया, नियमांचे पालन झाले की नाही, तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा मुद्दा यावर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान उपाध्यक्षांनी ११३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्याबाबत सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.

कामगारांना कामगार कायद्यांनुसार पुन्हा सेवेत घेता येईल का, याबाबत कामगार विभागाने सखोल अभ्यास करून योग्य तो अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले.

संबंधित प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी लवकरच पुढील बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. यावेळी संबंधित सुरक्षारक्षक हे शुभम एचपी सिक्युरिटी कंपनी या कंपनीमार्फत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणातील अंतिम निर्णय अहवालानंतर घेतला जाणार असून, कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा