Tuesday, May 26, 2026

Solapur College of Engineering : आदिवासी आश्रमाशाळांची श्रेणीवाढ

Solapur College of Engineering : आदिवासी आश्रमाशाळांची श्रेणीवाढ

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; सोलापूर आणि तुळजापूरमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा

मुंबई : आदिवासी बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच उच्च व तंत्रशिक्षणाचा विस्तार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या २४ आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करणे, सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तीन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणे आणि तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाला हस्तांतरित करण्याचा समावेश आहे.

डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासी मुलांचे शिक्षण अधिक गतीमान व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या ५ प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानुसार, प्राथमिक शाळांचे माध्यमिकमध्ये, तर माध्यमिक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालयात रूपांतर केले जाणार आहे. या निर्णयासाठी आवश्यक पदांची निर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय सोलापूर आणि परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘एआय अँड मशिन लर्निंग’, ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन’ या तीन अभ्यासक्रमांचा समावेश असून, प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० असणार आहे.

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे ‘श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय’ आता महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार असून, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने या परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >