Tuesday, May 5, 2026

PM Narendra Modi : “गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे” – पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : “गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे” – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आजघडीला गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत कमळ फुलल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची निकाल जाहीर झाल्यानंतर ते सोमवारी संध्याकाळी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा मी याच ठिकाणाहून आपण सर्वांना सांगितले होते की गंगा बिहारमधून पुढे वाहत गंगासागरपर्यंत जाते. आज बंगालमधील विजयासह गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत सर्वत्र कमळच कमळ फुलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल या गंगेच्या किनारी वसलेल्या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. पाचही राज्यांमधील जनतेला धन्यवाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, हा दिवस ऐतिहासिक आहे, कारण पक्षाने तीन विधानसभांमध्ये भाजपने अव्वल स्थान मिळवले आहे. आजचा दिवस कामगिरी, स्थिरता आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारसरणीवरील विश्वास व्यक्त करण्याचा दिवस आहे, तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा (PM Narendra Modi) उमेदवार म्हणून जबाबदारी दिली आणि मी काशी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असताना पत्रकारांनी मला घेरले होते. त्या वेळी माझ्या मनातून सहज एक भावना व्यक्त झाली आणि मी म्हणालो होतो की मी स्वतःहून आलो नाही, मला कोणी पाठवलेले नाही, मला माता गंगाने बोलावले आहे. आणि आज प्रत्येक क्षणी मला जाणवते की माता गंगेचा आशीर्वाद सतत आपल्यावर राहिला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळेच कमळ फुलले आहे, तसेच मतदारांनी जगाला दाखवून दिले की भारताला लोकशाहीची जननी का म्हटले जाते. त्यांनी म्हटले की जय-पराजय हा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. परंतु पाच राज्यांतील जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की भारताला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ का म्हटले जाते. लोकशाही आमच्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही, ती आमच्या रक्तात वाहणारी संस्कृती आहे. आज केवळ भारताची लोकशाहीच जिंकलेली नाही, तर भारताचे संविधान, संवैधानिक संस्था आणि लोकशाही प्रक्रिया यांचाही विजय झाला आहे. (PM Narendra Modi)

पश्चिम बंगालमध्ये सुमारे ९३ टक्के मतदान होणे हे स्वतःमध्ये ऐतिहासिक आहे. आसाम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही मतदानाचे नवे विक्रम नोंदवले गेले असून महिलांचा सहभाग विशेषत्वाने अधिक होता. हे भारतीय लोकशाहीचे अत्यंत उज्ज्वल चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ४ मेची ही संध्याकाळ जरी मावळत असली तरी बंगालच्या पवित्र भूमीवर आज नव्या सूर्योदयाची सुरुवात झाली आहे. या क्षणाची अनेक पिढ्या वाट पाहत होत्या. भाजपने जिंकलेल्या जागा या केवळ निवडणुकीतील आकडे नाहीत, तर त्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहेत ज्याने भीती, तुष्टीकरण आणि हिंसेच्या राजकारणाला मुळापासून संपवल्याचे पंतप्रधांनी यावेळी सांगितले.(PM Narendra Modi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा