Sunday, May 3, 2026

Election Result : पाच राज्यांचा निकाल सोमवारी जाहीर होणार, कोणाला मिळणार मतदारांचा कौल ?

Election Result : पाच राज्यांचा निकाल सोमवारी जाहीर होणार, कोणाला मिळणार मतदारांचा कौल ?

नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल - मे दरम्यान झालेल्या पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. यामध्ये ममता बॅनर्जी आपला गड राखणार की भाजप काबीज करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान राज्यातील बारामती आणि राहुरी दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांच्या निकालाची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एप्रिल - मे दरम्यान झालेल्या या मतदानानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष उद्याच्या मतमोजणीकडे लागले आहे. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेल्या आहेत. सर्वाधिक लक्ष बंगालच्या निवडणुकीवर असेल. उद्या सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत बहुतांश राज्यांचे कल स्पष्ट होतील. या निकालांचा परिणाम आगामी राष्ट्रीय राजकारणावर आणि केंद्रातील सत्ता समीकरणांवरही पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि हिमंता बिस्वा सरमा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला उद्याच्या निकालांवर अवलंबून आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी या दोन विधानसभेच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता उद्या या दोन्ही ठिकाणचा निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर दुसरीकडे दिवंगत आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक रिंगणात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. यंदा या राज्यात दोन टप्प्यात (२३ आणि २९ एप्रिल) मतदान झाले. सध्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असून तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. भाजपने येथे मुख्य विरोधी पक्ष म्हणून तगडे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, मतदानाच्या टक्केवारीने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत ९२ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. २०२१ मध्ये टीएमसीने २१५ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप ७७ जागांवर अडकला होता. यावेळी ही लढत अधिक चुरशीची मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांच्या विधानसभेत १४८ हा मॅजिक फिगर आहे.

दक्षिण भारताचे महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात ८४ टक्के मतदान झाले. द्र्रविडी राजकारणाची पाळेमुळे घट्ट असून यंदाही मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यातच पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके सत्ता राखण्याचा प्रयत्न करत आहे. २०२१ मध्ये १३३ जागांसह डीएमके सत्तेत आले होते, तर एआयएडीएमके ६६ जागांसह विरोधी पक्षात आहे. तामिळनाडूत २३४ पैकी ११८ जागा जिंकणारा पक्ष सत्ता स्थापन करेल.

केरळमध्ये एकाच टप्प्यात ७९.७ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने आव्हान दिलं आहे. केरळमध्ये एकूण १४० जागा असून बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे. सद्यस्थितीत एलडीएफ (LDF) आघाडीचे सरकार असून पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) ही आघाडी येथे प्रबळ विरोधी पक्ष आहे. गेल्या वेळी डाव्यांनी ९९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते.

ईशान्य भारतातील प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये एकाच टप्प्यात ८० टक्के मतदान झाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे येथील निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आसाममध्ये १२६ जागांच्या विधानसभेत ६४ जागा हा बहुमताचा आकडा आहे. सद्यस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने महाआघाडी करून मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी भाजपने ६० जागांसह सत्तेची सूत्रे हाती घेतली होती.

पाँडिचेरी (पदुच्चेरी) या केंद्रशासित प्रदेशात ३० जागांसाठी एकाच टप्प्यात ८१ टक्के मतदान झाले. येथे एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची युती सत्तेत आहे. पाँडिचेरी (पदुच्चेरी) येथे ३० जागांपैकी १६ जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. सद्यस्थितीत मुख्यमंत्री एन. रंगास्वामी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर काँग्रेस आणि डीएमके आघाडीने त्यांना जोरदार टक्कर दिली आहे.

बारामतीत मताधिक्य कोणाला याकडे लक्ष

बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार असून दुपारी बारापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे फक्त चर्चाही त्यांच्या ऐतिहासिक विजयाची होताना पाहायला मिळत आहे. त्या किती मोठे मताधिक्य घेऊन विजयी होणार याबाबतच्या चर्चा सध्या बारामतीच्या वर्तुळात पाहायला मिळत आहे.

निकालाआधीच फ्लेक्स आणि होर्डिंग्ज झळकले

तर दुसरीकडे, निकालाच्या आदल्या दिवशीच पुणे शहरात लागलेल्या फ्लेक्स आणि होर्डिंग्जमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकाल लागण्यापूर्वीच पुण्यामध्ये अक्षय कर्डीले विजयी झाल्याचे बॅनर झळकले. भाजपकडून राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अक्षय कर्डिले यांना विजयाबाबत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पुण्यातील नगर रोड परिसरात “मित्र अभिनंदन आमदार झाल्याबद्दल” अशा मजकुराचे बॅनर्स झळकत आहेत. हे फ्लेक्स सुधीर वाघमोडे मित्र परिवार यांच्या वतीने लावण्यात आल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. निकाल अद्याप अधिकृतरीत्या जाहीर होण्यापूर्वीच असे अभिनंदनपर बॅनर्स लावले गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हा मतदारसंघ पुण्यापासून साधारण १५० ते १८० किलोमीटर अंतरावर असून देखील या विजयाचा विश्वास पुण्यातील भाजपाला वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment