Sunday, May 3, 2026

Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग दुसऱ्या मजल्यावरील एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग काही क्षणांतच इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली.

आग इतकी भीषण होती की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. काहींचे मृतदेह बेडवरच आढळले, तर काही जणांचे मृतदेह जिन्यावर जळालेल्या अवस्थेत सापडले. तिसऱ्या मजल्यावर राहणारे काही लोक जीव वाचवण्यासाठी छताकडे पळाले, मात्र छताचा दरवाजा बंद होता. दरवाजा बंद असल्यामुळे बरेच जण अडकले आणि जिन्यावरच त्यांचा मृत्यू झाला.

इमारतीच्या पुढील बाजूस राहणाऱ्या काही रहिवाशांना वाचवण्यात यश आले, मात्र मागच्या बाजूस असलेल्यांना बाहेर काढणे कठीण ठरले. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे, तीन मृतदेह बेडवर आढळले असून यावरून आगीची तीव्रता लक्षात येते.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की, दुसऱ्या मजल्याच्या मागील बाजूस पाच मृतदेह सापडले, तर एक मृतदेह मागील भागात आणि तीन वरच्या मजल्यावर आढळले. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी कटण्यात येणार आहे.

अग्निशमन अधिकारी मुकेश वर्मा यांच्या माहितीनुसार, इमारतीच्या मागील बाजूस आग लागली होती, इमारतीतून नऊ जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. इमारतीत फक्त एकच जिना होता आणि बाल्कनीला जाळ्या लावल्या असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी आल्या. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा