नाशिक : कुंभमेळा पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादन अखेरच्या टप्प्यात आले असताना शनिवार (दि.२) मातोरी व मुंगसरा येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भुसंपादन अधिकारी व पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा मारहाणीचा हा आरोप मात्र जिल्हा प्रशासनाने फेटाळला असून भूसंपदानाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिंग रोड साठी २५ पैकी १९ गावांमध्ये भूसंपादनाच्या मोजणीची प्रक्रिया आटोपलेली आहे. याप्रकरणी चार गावे मुंबई उच्च न्यायालयात गेले असून त्यात मातोरी, मुंगसरा या गावांचाही समावेश आहे. भूसंपदनामुळे शेतकऱ्यांचे घरे, बंगले बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी आलायमेन्ट बदलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच भूसंपादनविरोधात मुबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.
याप्रकरणी येत्या ४ तारखेला सुनावणी पार पडणार आहे असे असताना जिल्हा प्रशासनाने या दोन गावामधील शेतकऱ्यांना १ मे रोजी मोबाईलवर मेसेज करून २ मेला सकाळी ९.३० वाजता भूसंपादन अधिकारी मोजणीस येणार असल्याचे सांगितले. मात्र सकाळी ७ वाजताच मोठ्या पोलिस बंदोबस्तासह भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी दाखल झाले.
यावेळी पोलीस व अधिकाऱ्यांनी आम्हाला बळाचा वापर करीत घराच्या बाहेर काढले आणि महिलांना मारहाण केली, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच बळजबरीने गाडीत बसवून नाशिक तालुका पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तर महिलांना मोजणीच्या ठिकाणी पोलिसांच्या गाडीत डांबून ठेवण्यात आले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भूसंपादनाचा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता असून प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






