सभागृहनेत्यांच्या गिनतीत विरोध पक्षनेत्या नाहीच, आझमींचाच घेतला समाचार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सभागहनेते गणेश खणकर यांनी सन २०२६-२७चे अर्थसंकल्पीय भाषणात विरोधकांवर प्रहार करतानाच हिंदीतून शेरोशायरी करत त्यांचा मिश्कील शब्दांत समाचारही घेतला. मात्र, महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असून विरोधी पक्षनेत्या या माजी महापौर किशोरी पेडणेकर या आहेत. पण विरोधी पक्षनेत्यांना गिनतीतच न धरता खणकर यांनी काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांच्या भाषणाचाच समाचार घेत उबाठा नव्हेतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेता असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना त्यांनी आम्ही पुढची २५ वर्षे तरी या जागेवरून हटत नाही असेही विरोधकांना सुनावले.
मुबई महापालिकेच्या सन सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना सभागृहनेते गणेश खणकर यांनी सुरुवातीलाच काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांचा सडकून समाचार घेताना नक्की आपण कुणाच्या विरोधात बोलत आहात असा सवाल केला. सन २०१७मध्ये आम्ही फक्त दोनने कमी होतो. मनात आणले असते तर सत्तेवर आलो असतो. पण आम्ही मैत्री जपली. जर आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो तर आमची संजय घाडी हे ज्या खुर्चीवर बसले आहेत, तेवढीच आमची क्षमता राहिली असती. पण २०१९मध्ये आपण त्यांच्यासोबत गेलात आणि आमच्यावर मोठी मेहरबानी केलात. त्यामुळेच आम्ही तिथून इथे आल्याचे सांगत काँग्रेसचे आभार मानले.
यावेळी खणकर यांनी अश्रफ आझमी यांनी रस्त्यांवरील खड्डयांवरील होणाऱ्या खड्डयांची खोटी माहिती दिल्याचे सांगत खरी माहिती सादर करत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले. तर मुदतठेवींच्या मुद्दयावरूनही विरोधकांचा समाचार घेत हा पैसा रस्ते आणि इतर पायाभूत प्रकल्पांसाठीच खर्च केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विलंबाने भरल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या बिलावर आकारल्या जाणाऱ्या दोन टक्क्यांऐवजी एक टक्का दंड आकारला जावा अशी मागणी केली.
तसेच बेस्टला महापालिकेने आर्थिक मदत करायलाच हवी आणि ती फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतन आणि इतर भत्ते देण्यासाठी द्यावे, कारण हे सर्व कामगार मराठी असून त्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे यासाठी १ हजार कोटीं व्यतिरिक्त आर्थिक मदत बेस्टला करण्याची मागणी केली. हा आकडा मोठा असला तरी त्या कामगारांच्या भावनांच्या तुलनेत कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत पाण्याची तुट मोठ्याप्रमाणात असून गळती व चोरीच्या माध्यमातूनच १५ ते २० टक्के पाणी वाया जात आहे असे सांगत जेव्हा प्रत्यक्षात मुंबईकरांना ४२०० दशलक्ष लिटर सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३५०० ते ३६०० दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळत असल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी सी लिंकची पायाभरणी केली नसती, कोस्टल रोड केला नसता, मेट्रो प्रकल्प राबवले नसते तर आपण आजजी सेवा घेतो, ती मिळाली नसती. कोस्टल रोडमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ५८ टक्के कमी झाले आहे, विस्तारीत कोस्टल रोडमुळे वर्षाला ८० हजार कोटी रुपये वाचणार आहेत.
आज पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होत आहे, खारफुटीच्या जागेवर भराव टाकून त्या जागा बुजवल्या जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे निसर्गाचा ऱ्हास होताना तिथे का पाहत नाही असाही सवाल केला. सन २०१०पासूनचा जीआयएस मॅप काढून बसा आणि जिथे अनधिकृत बांधकामे झाली आहेत, भराव घालून झोपड्या बांधल्या त्यावर कारवाई करा, कुणाला तरी आता घरी बसवलेच पाहिजे, त्याशिवाय या अनधिकृत बांधकामांना आळा बसणार नाही, आयुक्तांनी हे पाऊल उचललेच पाहिजे.
तसेच सन २०२२ ते २०२५ पर्यंत ज्या छोट्या रस्त्यांची कामे झाली आहेत त्यांची आयआयटी मार्फत चौकशी करा, म्हणजे अधिकाऱ्यांची पितळ उघडी पडतील असे सांगितले.
महापालिकेच्या सर्व प्रसुतीगृहांसह रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी काचेची पेटी उपलब्ध देण्याची मागणी केली. पाण्याच्या लाईनला यापुढे एकाही कंत्राटदाराला हात लावायला देवू नका, हे काम आपल्याच कामगारांकडून करून असेही सांगितले. यापुढे कंपन्यांसाठी निविदा नाही तर कामांच्या आवश्यकतेनुसार निविदा बनतील, जो अधिकारी कंपन्यांना फेव्हर करण्यासाठी ठराविक अटींचा समावेश करून निविदा बनवेल त्याला घरी बसवणारच असेही सांगितले.