Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोजच नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता पुन्हा एकदा खरात प्रकरणात चक्रावणारी माहिती समोर आली आहे. 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमके प्रकरण काय ?
फिर्यादी राजेंद्र अशोक जासूद यांना त्यांच्या लॉजिस्टिक व्यवसायाचा जगभर विस्तार करायचा होता. याचाच फायदा घेत संधीसाधू अशोक खरातने त्यांना 'अवतार पूजा' करण्याचा सल्ला दिला. ही पूजा करण्यासाठी तीन देश फिरावे लागतील तसेच ईशान्येश्वर मंदिरात पूजा करावी लागेल, असे भोंदू खरातने फिर्यादीला सांगितले. धक्कादायक म्हणजे, पूजेदरम्यान जासूद यांना नकली साप दाखवून घाबरवण्यात आले. "जर ही पूजा केली नाही, तर तुझा मृत्यू अटळ आहे," अशी भीती घालून खरातने जासूद यांच्याकडून तब्बल 5 कोटी रुपये उकळले.
सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने फिर्यादीला मृत्यूची भीती घालत मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. ईशान्येश्वर मंदिरात नेमकी कसली पूजा चालत होती? आणि या पैशांचा वापर नेमका कुठे झाला? याचा तपास करण्यासाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. (Ashok Kharat Case)
खरातच्या वकिलांचा युक्तिवाद
दुसरीकडे, खरातच्या वकिलांनी सांगितले की, सर्वात पहिला गुन्हा वावी पोलिसात नोंदविण्यात आला होता. दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अशोक खरात यांनी गुन्हा दाखल केला होता. सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादमध्ये वावीच्या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती नाही. यानंतर नीरज जाधव नावाचा माणुस पुढे आला. त्याने स्पाय कॅमरा लावून व्हिडीओ चित्रित केले. ते सर्व व्हिडीओ त्याने दिनेश परबला दिले. या प्रकरणी दिनेश परबला अंतरीम जामीन उच्च न्यायालयाने दिला. नीरज जाधव याला माफीचा साक्षीदार होण्यास पोलिसांनी सांगितले.
वावीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 महिन्यांनी जासूदला फसवणूक झाल्याचे जाणवले. पैशाचा व्यवहार झाला असे म्हणतात पण, या घटनेला महिना उलटून गेला त्याचा तपास झाला असेल. सापाचा विषय आज काढला, तो याआधी ही चर्चेत आला आहे. हे तीन देश फिरले त्याचे फोटो दाखविले, ते आम्ही सहमतीने गेलो, एकत्र खर्च केला असा दावा जासूद ने याआधी बेल अप्लिकेशनमध्ये केला आहे. जी गाडी दिली ती गिफ्ट दिली आहे. या गुन्ह्याचा तपास वावी पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्यात आहे. त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला. (Ashok Kharat Case)
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात खरातने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचे महत्त्वाचे पुरावे मिळण्याची आणि नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.






