भारतीय पर्यटनाचे स्वरूप बदलणारे ‘सॅफ्रनस्टेज’

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे


भारतीय प्रवाशांची मानसिकता गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलत आहे. केवळ पर्यटन स्थळ पाहणे इतक्यावर समाधान न मानता, आता प्रवासी त्या ठिकाणाच्या संस्कृतीत मिसळून ‘स्थानिकांसारखे’ जगण्याचा अनुभव शोधत आहेत. याच बदलत्या प्रकृत्तीला ओळखून एक अनोखी वाट चोखाळली ती ‘सॅफ्रनस्टेज’ या कंपनीने.


२०१६ साली तेजस परुळेकर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज देशभरातील नयनरम्य ठिकाणी खासगी, आलिशान बंगल्यांमधून प्रवाशांना वेगळाच अनुभव देत आहे. एका कर्मचाऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज ११५ कर्मचारी, ३५० केअरटेकर्स आणि तब्बल ४५ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. या यशामागे आहे एक साधी, पण प्रभावी कल्पना. तेजस आणि तिचे पती देवेंद्र परुळेकर यांनी आपल्या युरोप प्रवासादरम्यान अनुभवलेल्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ आणि अपार्टमेंट स्टेने त्यांना विचार करायला भाग पाडले. लहान मुलांसोबत प्रवास करताना हॉटेलपेक्षा खासगी जागा, स्वयंपाकघर आणि निवांत वातावरण किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना जाणवले.


स्पेन आणि फ्रान्समधील संथ, आरामदायी सुट्ट्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. भारतामध्ये अशी सोय सहज का उपलब्ध नाही?


मुंबईत वाढलेल्या तेजसला प्रवासाची आवड लहानपणापासूनच होती. तिच्या वडिलांच्या नोकरीमुळे तिच्या कुटुंबाला माथेरान, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी हॉलिडे होम्समध्ये राहण्याचा अनुभव मिळत असे. तिचं कुटुंब एका आठवड्यासाठी पूर्ण बंगला भाड्याने घेत. स्वयंपाकीसोबत असायचा. तो संपूर्ण बंगला आपल्यासाठी आहे ही भावना काही काळापुरती का असेना पण समाधान देऊन जायची. तो अनुभव अविस्मरणीय तेजससाठी होता. आर. ए. पोदार कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तेजस हिने सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाऊंटंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आयसीआयसीआय लिमिटेडमध्ये मुख्य व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. कालांतराने तिचे लग्न देवेंद्र परुळेकर यांच्यासोबत झाले. ते अर्न्स्ट अँड यंग या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. स्थिर करिअर असूनही, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा तेजसला स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक वर्षांच्या संशोधन आणि नियोजनानंतर २०१४ मध्ये तिने ‘सॅफ्रनस्टेज’ची सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनी फक्त होमस्टे एग्रीगेटर म्हणून कार्यरत होती. मात्र, २०१५ मध्ये माथेरानमधील एका १०० वर्षे जुन्या पारशी घराच्या व्यवस्थापनाची संधी मिळाली आणि इथेच व्यवसायाला नवे वळण मिळाले. त्या क्षणापासून सॅफ्रनस्टेजने केवळ घरांची यादी न देता, स्वतः त्या मालमत्तांचे व्यवस्थापन आणि देखभाल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह अनुभव मिळू लागला.


आज सॅफ्रनस्टेजकडे सुमारे २७० हून अधिक मालमत्ता उपलब्ध आहेत. मुंबईजवळील कर्जत, लोणावळा, पालघरपासून ते उत्तर भारतातील शिमला, मनाली, नैनिताल आणि दक्षिणेतील कुर्ग, ऊटी, वायनाडपर्यंत या सेवा विस्तारल्या आहेत. कोविड-१९ महामारीने जिथे अनेक व्यवसायांना फटका बसला, तिथे सॅफ्रनस्टेजसाठी हा टर्निंग पॉइंट ठरला. लोकांनी गर्दीच्या हॉटेल्सऐवजी खासगी व्हिलांना पसंती दिली. २०१९-२० मध्ये १५ कोटी असलेली उलाढाल त्याच्या पुढच्या वर्षी २० कोटींवर पोहोचली. लॉकडाऊननंतर तर ९०% पर्यंत बुकिंग्स व्हायचे असा तेजसचा दावा आहे. सॅफ्रनस्टेजचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्थानिक समुदायांवर दिलेले लक्ष. कंपनी स्थानिकांना केअरटेकर म्हणून नोकऱ्या देते. स्थानिक अन्नसाहित्य वापरते. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. विशेष म्हणजे, कंपनीत ३५% महिला कर्मचारी आहेत. जे लैंगिक समतेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.


यशाच्या या प्रवासात त्यागही तितकाच महत्त्वाचा आहे. तेजस सांगते, “आम्ही आमची जीवनशैली साधी ठेवली. महागड्या गोष्टींचा मोह टाळला. उद्योजकतेसाठी हा त्याग आवश्यक असतो.” सॅफ्रनस्टेजचे लक्ष्य आता आणखी मोठे आहे. वर्षाअखेरीस २०० नवीन घरे जोडण्याची योजना असून, किल्ले, राजवाडे आणि वारसा स्थळांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय ‘सॅफ्रनस्टेज जर्नीज’ या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण प्रवास अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या बदलत्या पर्यटन युगात, सॅफ्रनस्टेजने एक नवा ट्रेंड निर्माण केला आहे. प्रवास म्हणजे केवळ ठिकाण पाहणे नव्हे, तर त्या ठिकाणाला अनुभवणे. भारतातील खऱ्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर सॅफ्रनस्टेज हे पहिले नाव असावे, हे तेजसचं स्वप्न आहे.


एक अनुभव व्यवसायात कसा बदलू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.

Comments
Add Comment

वसंत वैभव

माेरपीस : पूजा काळे ल्या ऋतूच्या बहरापूर्वी, पानगळीला ऊत येतो. कात टाकूनी नवं रुजवाया, खुणा दावित निसर्ग जातो.

महानुभावांच्या योगदानाची ‘साहित्य सरिता’

मराठी भाषा आणि भाषेतील साहित्य संवर्धनासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

नावीन्यपूर्णतेच्या युगाचा करा स्वीकार

गेल्या काही महिन्यांमध्ये ओरॅकल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये

आयटी क्षेत्रातील अदृश्य बेड्या

प्रदेश सरचिटणीस - किरण मिलगीर भारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या आयटी (Information Technology) क्षेत्रातून

वाचू आनंदे

माेरपीस - पूजा काळे अपरिमित कौशल्याची कुशाग्र बुद्धी ही मानवाला लाभलेली सर्वात मोठी देणगी होय, जिच्या जोरावर

थंडीच्या कुशीत वॉर्मीचं ऊबदार साम्राज्य

दी लेडी बॉस - अर्चना सोंडे २००९ साल. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत ‘ती’ आपल्या पती आणि मुलासोबत सुट्टीसाठी