...चला जपूया नाती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये वावरताना एकमेकांसाठी कामाला येणे हे त्याचे काम असते. सतत सहकार्य, परोपकार, सेवा यातून तो घडत असतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने तो संस्कृतीचा वारसा संक्रमित करत असतो. संस्कृती जतन, संवर्धन करणे हे त्याचे मुख्य काम. हे देखील एकमेकांच्या सहाय्याने होत असते. एकटा माणूस कोणतीच गोष्ट करू शकत नाही. कारण समाजामध्ये वावरताना माणूस सामाजिक प्राणी आहे हे सर्वप्रथम महत्त्वाचे.


समाज चार माणसांपासून एकत्र येऊन बनलेला. जन्माच्या गोष्टीपासून सुरुवात होते ती जनसमुदायातूनच पाचवी, बारसं, मुंज, शिक्षण, पुढे लग्न... इथेच येऊन थांबते का हे... तर नाही. पुढेही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, टप्प्यावर त्याला सर्व माणसांना बरोबर घेऊन चालावे लागते. आपल्या पूर्वजांनी सुद्धा हेच केले आणि ते म्हणून पुढे गेले. गाव करील ते राव काय करील. सुखदुःखामध्ये माणसांची साथ महत्त्वाची असते, अनमोल असते. मन खंबीर आणि पाठबळ देण्यास ती हवी असते. स्फूर्ती, प्रेरणा, चैतन्य, उत्सव, कौतुक, आनंद, दुःख असेल तर सांत्वन अशा प्रत्येक टप्प्यावर आयुष्याला बळ देते. प्रत्येकाने आपापल्या माणसांना जपलं पाहिजे. नाती जपली पाहिजे. जनसमुदाय दांडगा केला पाहिजे.


आपल्याकडील उत्तम अशी एक ठेव म्हणजे आपली भावंडं. पूर्वीच्या काळी चार चार मुलं असायची, त्यापूर्वी तर नऊ, बारा बारा मुलं असायची. आता फॅन्सी दुनियेमध्ये एक तर मूल होऊच देत नाहीत किंवा एकच मूल असतं. मग आपल्या संस्कृतीचा जपून ठेवलेला मौल्यवान ठेवा म्हणजे बहीण, भाऊ हे केवळ नातं नाही तर ती सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी प्रथम धावून जाणे ही किमया फक्त तेच साधू शकतात. आयुष्यात पुढे जाऊन एकमेकांपासून दूर न जाता एकमेकांच्या कामी येतात. मोठे होत गेलं तस तसं आयुष्याला पंख फुटत जातात. प्रत्येकाचे संसारप्रपंच वेगळे. जीवन जबाबदाऱ्या वेगळ्या पण संसारात िकतीही रमले, घडले तरी त्यातून बाहेर पडत काही निमित्ताने वर्षातून अधेमधे एकत्र जमतात. भाऊ-बहिणींच्या अशा भेटी आता क्वचित दिसतात, याचं कारण काय आहे की सख्खे मावस चुलत आते, मामे अशी भावंडं आता गरज किंवा निकड झाली आहे. एका मुलीला एक सख्खा रक्ताचा भाऊ असावा. एक मुलगा एक मुलगी नसेल तर दोन्ही मुली पण एकाला दुसरं भावंडं हवं. आई-वडिलांना जास्त जबाबदाऱ्या नको, महागाई आहे भागत नाही किंवा त्रास नको या सगळ्या बिन बुडाच्या खुर्चट कल्पनांनी वेढलेलं असतं.


जसजसं वय वाढत जातं तसतशा व्यक्ती हळव्या होऊ लागतात आणि उतारवयामध्ये एक मूल असेल आणि तेही नोकरी धंद्यासाठी परदेशात गेलं तर आई-वडिलांना आधार राहात नाही. म्हणूनच एका बरोबर दुसरं अपत्य जन्मास घालावं म्हणजे मग चौकोनी कुटुंबातील भाऊ-बहिणीला आई-वडिलांना मायेची खरी किंमत कळते. त्याच प्रेमाच्या धाग्याने सगळे एकत्र बांधून राहतात. त्या आठवणी, ते संस्कार, ती ओढ जीवनामध्ये अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर बालपणापासून ते वृद्धापकाळपर्यंत एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या कामी येण्यासाठी भाऊ-बहिण हे अत्यंत महत्त्वाचं नातं आहे. पण हल्ली ही गोष्ट रास पावत आहे. नाश होत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मायेची किंमत कळते, ती काही गुगलवर मिळत नाही.


इंटरनेटवर किंवा नेटवर्कच्या जाळ्यामध्ये माणूस इतका गुंतलाय की, जवळ असून सुद्धा तो लांब झालेला आहे पण भावनेला जी किंमत आहे ती कोणत्या औषधाला नाही. अश्रू पुसायला देखील दोन हात लागतात आणि सुखदुःखात मिठी मारायला देखील आपली आपुलकीची हक्काची ‌व्यक्ती लागते. हे केवळ विश्वासाच्या नात्यात देता येतं. ज्ञानोबा मुक्ताईचं प्रेम, कृष्ण द्रौपदीचे प्रेम हे इतिहास जमा झालेलं नाही तर आजही भाऊ-बहिणीचे नातं तसंच आहे. चिरकाल टिकणारं. अजरामर असलेलं आणि अखंड, अक्षय्य. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जीवन सार्थकी लावायचे असेल तर नाती मजबूत असली पाहिजेत. अपेक्षांचा ओझं लादलं तर नाती कमकुवत होतात, नात्यांमध्ये उदारता, उबदारपणा आणि उत्साह असावा.


नाती मग ती रक्ताची आणि मानलेली सुद्धा शेवटपर्यंत साथ देतात. त्यांच्याशी जुळवून घ्या. चुकलं तर माफ करा. चूक पदरात घ्या. चुकीतून शिका. कोणतीही मनामध्ये अढी किंवा गाठ न ठेवता राखीची गाठ पक्की करा. एकुलती एक मुलं एकलकोंडी असतात आणि एकांतात वाढल्यामुळे त्यांची वृत्ती संकुचित असते. म्हणून शेअरिंग आणि केअरिंग या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भविष्यात देखील आपण कोणत्या वळणावर आहोत... समाजामध्ये एकाकी, स्वार्थी एकलकुंडी संकुचित वृत्तीची माणसं मिसळत नाहीत आणि त्यामुळे समाजाचं आणि त्या माणसांचं नुकसान होतं. जीवनामध्ये नेतृत्व करायचं असेल, तर पुढाकार घ्यायला हवा आणि सर्वांसाठी आपल्यासह सर्वांचा विचार करावा. मोठी गडगंज संपत्ती, प्रचंड मोठं घर, सधनता, शेतीवाडी, जमीन-जुमला, बंगला, गाडी हे सगळं असून सुद्धा ती मुले एकाकी असतात. मानसिक कोंडमारा होतो. त्यांना व्यक्त होता येत नाही. झालेच तर व्यक्त होण्याचे माध्यम अतिशय घातक असते. म्हणूनच एकाला दुसर हवं. सोबतीसाठी म्हणून प्रत्येक स्त्रीनं असा निर्णय घ्यावा की माझ्या मुलीला भाऊ हवा. भावाला बहीण हवी. म्हणून किमान दोन अपत्यं तरी आपण जन्माला घालू. जेणेकरून आपल्यानंतर ही आयुष्यभर एकमेकांना जपतील आणि कधी कुणी आई, तर कोणी वडील होतील. आपल्या भारताच्या गौरवशाली संस्कृतीवर समाजावर पिढ्यानपिढ्या झालेले संस्कार पुढे नेण्यासाठी आपल्या या संस्कृतीच्या शिलेदारांना आपणच मनोबल देऊया.


उद्याचे सुजाण भावी नागरिक घडवताना आपण आपल्या मुलांना काय देत आहोत हे प्रत्येकाने तपासून पाहा. कोणतेही विष मनात पेरण्यापेक्षा अमृत मंथन करा. आत्मपरीक्षण करा. आजही अनेक पूर्वग्रह दूषित, फॅन्सी आधुनिक जोडपी मुलंच नको, मुल जन्माला घालायचं नाही. या निर्णयाने पछाडलेली आहेत. ते कितपत योग्य आहे? किमान दोन अपत्यं तरी असली तर आपली लोकसंख्या, आपली नैसर्गिक मानव संपत्ती अबाधित राहील. तुटवडा पडणार नाही. लग्न जमवताना मुला मुलींच्या तुटवड्याचाही प्रश्न असतो. हा प्रश्न मनोमन स्वतःला विचारा, प्रश्नातून उत्तर शोधा आणि कृपया याबाबत प्रबोधन करा ही विनंती. काही नैसर्गिक आपत्ती मानवी आपत्ती किंवा संकटांना तोंड देताना समस्यांना सामोरे जाताना आपल्याबरोबर आपली माणसं हवीत! म्हणूनच आपली माणसं निर्माण करा. त्यांना जपा. त्यांची काळजी घ्या.


Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी