न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे


कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या कुटुंबीयांनाही भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. या आजारामुळे रुग्णाला असह्य वेदना होत असतात आणि प्रत्येक क्षण जीवाच्या कोंडमाऱ्यात जगावा लागतो. कणाकणानं मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीला आपल्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे, अशी मनात भीती वाटत असते. न जाणो कोणता श्वास आपला अंतिम श्वास ठरेल असं तिला वाटत असतं. सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतन (बहल) यांना जेव्हा आपल्याला कर्करोगानं ग्रासलं आहे हे समजलं तेव्हा त्यांचं कुटुंबीय हादरले. कर्करोगाबरोबरची पहिली लढाई नूतन यांनी जिंकली; परंतु पुन्हा एकदा दुर्दैवानं त्यांच्या यकृताला (लिव्हर) कर्करोग झाला! उद्भवलेल्या नव्या परिस्थितीमुळे नूतन यांनी आपले पती रजनीश बहल यांच्याकडून वचन घेतले...


साधेपणा आणि निरागस चेहऱ्याने चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या नूतन यांचा ४ जून, १९३६ या दिवशी मुंबईतील कुमारसेन समर्थ आणि शोभना समर्थ या दांपत्याच्या कुटुंबात जन्म झाला. नूतन यांच्या मातोश्री शोभना समर्थ प्रख्यात अभिनेत्री होत्या, तर पिता कुमारसेन समर्थ चित्रपट निर्माते होते. घरात चित्रपटाचे वातावरण असल्याने नूतन यांनी वयाच्या नवव्या वर्षी बालकलाकार म्हणून ‘नल दमयंती’ या चित्रपटात काम केलं. नंतरच्या काळात नूतन यांनी ‘मिस इंडिया’ ही स्पर्धा जिंकली. त्यांना बालपणापासूनच चित्रपटाचं आकर्षण होतं.


१९५० साली वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी आपल्या मातोश्रींनी निर्माण केलेल्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘हमारी बेटी’नंतर नगीना, हमलोग, आगोश या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९५५ साली अभिनेते बलराज साहनी यांच्यासमवेत अमीय चक्रवर्ती दिग्दर्शित ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका केली आणि या भूमिकेबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ‘फिल्मफेअर’ पारितोषिक मिळालं. त्या काळातील प्रत्येक बडा अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर नूतन यांनी काम केलं. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या एस. डी. नारंग दिग्दर्शित ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटात नूतन यांनी प्रथमच पोहोण्याचा पेहराव (स्वीमिंग सूट) परिधान करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. किशोर कुमार त्या चित्रपटाचे नायक होते. नूतन यांनी वेगळ्या आणि चाकोरीबाह्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.


सुप्रसिद्ध बंगाली निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय निर्माण करीत असलेल्या ‘बंदिनी’ या चित्रपटातील नायिकेची भूमिका रॉय यांनी नूतन यांना देऊ केली. नूतन त्यावेळी गर्भवती असल्याने त्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध त्या चित्रपटातील भूमिका स्वीकारण्यास बिमल रॉय यांना नकार दिला; परंतु नंतर पती रजनीश बहल त्यांना समजावताना म्हणाले, की तू बिमल रॉय यांना नकार द्यावयास नको होता. पतीने समजूत घातल्यावर नूतन यांनी ‘बंदिनी’ चित्रपटात भूमिका केली आणि या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली इतकेच नव्हे तर हा चित्रपट त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.


आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत नूतन यांनी बारिश, सीमा, बंदिनी, छलिया, अनाडी, सुजाता, पेइंग गेस्ट, तेरे घर के सामने, दिल ही तो है, खानदान, मेहरबान, सौदागर, सरस्वतीचंद्र, मेरी जंग, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, मीलन, मैं तुलसी तेरे आंगन की, गौरी या आणि अन्य अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. जेव्हा त्यांना आपल्याला कर्करोग झाला असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी खचून न जाता या आजाराशी दोन हात करावयाचे ठरविले. कर्करोगाशी त्या न डगमगता लढल्या आणि त्यातून बऱ्या झाल्या.


त्यानंतर काही कालावधी सरला आणि १९९० साल उजाडले. म्हणता म्हणता त्या वर्षाचा डिसेंबर महिना आला. नूतन यांना काहीसा शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आणि त्या चाचण्यांमधून निष्पन्न झाले की नूतन यांना यकृताचा कर्करोग झाला असून तो बराच पसरला आहे. पती रजनीश त्यांना म्हणाले, की तू अजिबात घाबरू नकोस. मी तुझ्या उपचारांमध्ये कसलीही कमतरता भासू देणार नाही. परमेश्वराच्या कृपेने तू लवकर बरी होशील.


याआधी जेव्हा नूतन कर्करोगाने आजारी होत्या तेव्हा रजनीश यांनी परदेशातील डॉक्टरांकरवी त्यांच्यावर उपचार केले होते आणि त्या बऱ्या झाल्या होत्या. आता दुसऱ्यांदा कर्करोग झाल्यावरही सगळ्यांना वाटत होते की याही वेळी त्या आजारावर मात करतील; परंतु यकृताच्या कर्करोगाचे निदान होताच नूतन यांनी रजनीश यांच्याकडे वचन मागितले. त्या त्यांना म्हणाल्या, मला वचन द्या की तुम्ही मला वेदना होऊ देणार नाही आणि उपचारांसाठी परदेशात नेणार नाही! दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी रजनीश यांनी नूतन यांच्यावर भारतातच उपचार सुरू केले; परंतु उपचार केले जात असतानाच नूतन प्रदीर्घ बेशुद्धावस्थेत (कोमा) गेल्या आणि त्यांचा एक एक अवयव निकामी होत गेला. त्यांना वाचविण्याची शक्यता हळूहळू धूसर होत गेली आणि अथक प्रयत्न करूनही नूतन यांना वाचविता येऊ शकले नाही. २१ फेब्रुवारी, १९९१ या दिवशी नूतन यांचे मुंबईत निधन झाले.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर

मुमुक्षु : पटलावरचा प्रवास

इतिहासाच्या पाऊलखुणांनी आणि पराक्रमाच्या गाथांनी पावन झालेल्या या भूमीचा वारसदार असणं, यासारखं थोर भाग्य नाही.

मौनम् सर्वार्थ साधनम् ।

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर ही कथा आहे १७व्या दशकातील... त्यावेळी रशियामध्ये झार निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता.

नरक आणि नरक यातना

महाभारतातील मोतीकण -  भालचंद्र ठाकूर पृथ्वीवरील जीव अनेक प्रकारची कर्मे करतो. कर्माचेही सात्त्विक राजस व तामस

‘कोकणात आहे माहेर माझं...’

नॉस्टॅल्जिया -श्रीनिवास बेलसरे काळ होता ६०च्या दशकातला म्हणजे आजपासून सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा! भौतिक प्रगती

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

स्मृतीगंध-लता गुठे आजही ग्रामीण भागामध्ये ‘अधिक मासा’ला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण,