इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध थांबण्याची शक्यता पुन्हा एकदा धूसर झाली आहे. इराणने अमेरिकेशी थेट चर्चा करणार नाही, असे जाहीर केले आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून वाटाघाटी करू अशी भूमिका जाहीर केल्यानंतर इराणकडून परराष्ट्रमंत्री अराघची पाकिस्तानमध्ये पोहोचले. पण होर्मुझच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. अखेर अराघची यांनी इराणला परत जाण्याचा निर्णय घेतला. तर अमेरिकेच्या प्रतिनिधींनी त्यांचा पाकिस्तान दौराच रद्द केला.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघच यांच्या नेतृत्वात इराणचे शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी पाकिस्तानमध्ये पोहोचले. शिष्टमंडळ पाकिस्तानसोबत विविध मुद्यांवर चर्चा करत होते. पण होर्मुझच्या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. अखेर इराणच्या शिष्टमंडळाने मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमधून परत जात असल्याचे कळल्यामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधींनी त्यांचा पाकिस्तान दौराच रद्द केला आहे.
इराण - अमेरिका एकमेकांशी थेट बोलण्यास तयार नाही. होर्मुझच्या प्रश्नावर दोन्ही देशांचे समाधान होईल असा तोडगा निघणे कठीण झाले आहे. यामुळे युद्ध थांबण्याची शक्यता परत एकदा धूसर झाली आहे. याआधी इराणचे शिष्टमंडळ शनिवारी पाकिस्तानमध्ये पोहोचले. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीला पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख जनरल सय्यद आसिम मुनीर हे पण उपस्थित होते.
परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आता ओमान आणि रशियाचा दौरा करणार असून इराणची भूमिका त्यांना समजावून सांगणार आहेत. अराघची मायदेशी परतेपर्यंत इराण अमेरिकेशी आणि पाकिस्तानशी चर्चा करणार नाही. इराणची भूमिका जाहीर होताच अमेरिकेने थयथयाट सुरू केला आहे. निरर्थक चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून पाकिस्तानचा दौरा रद्द केल्याचे अमेरिकेने जाहीर केले. आमचीच बाजू वरचढ आहे आणि निरर्थक चर्चा करण्यासाठी लांबवरचा प्रवास करून निव्वळ बसून राहण्यास आम्ही इच्छुक नाही, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.






