मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत असून, संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला येणाऱ्या ६ जागांसाठी पक्षाने ३० संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. या यादीत प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले, तरी उर्वरित ५ जागांसाठी अनुभवी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यंदा भाजप पराभूत उमेदवारांऐवजी संघटनेतील नव्या चेहऱ्यांना संधी देत ‘धक्कातंत्र’ अवलंबण्याची चिन्हे आहेत.
विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता, भाजपला सहा जागा सहज निवडून आणता येतील. त्यासाठी प्रत्येकी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीचे एकूण ८ आमदार निवडून येणे सोपे असले, तरी भाजपने आपल्या कोट्यातील सहा जागांसाठी कोअर कमिटीमार्फत नावे अंतिम केली आहेत. या यादीत मुख्यत्वे माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, राजेश पांडे आणि राम सातपुते यांसारख्या नावांचा समावेश आहे. मात्र, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या नेत्यांना पुन्हा ‘मागच्या दाराने’ संधी द्यायची नाही, असे कठोर धोरण पक्षाने स्वीकारल्याचे समजते.
जे लोक जनतेतून निवडून येत नाहीत, त्यांचे राजकीय पुनर्वसन विधान परिषदेवर करणे योग्य नाही, असे मत भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या लांबलचक यादीतून अनेक बड्या नेत्यांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे. याउलट, जातीय समीकरणे साधणारे आणि संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या निष्ठवान कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित ?
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांचे पुनर्वसन निश्चित मानले जात आहे. भाजपच्या कोट्यातील सहापैकी एक जागा सातव यांना दिली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उर्वरित पाच जागांसाठी कोल्हापूरपासून नागपूरपर्यंतच्या अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ ४६ असल्याने त्यांचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करताना कोणती नवी समीकरणे मांडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारांची अंतिम घोषणा पुढील आठवड्यात दिल्लीतून होण्याची शक्यता आहे.
यादीत कोणाची नावे ?
माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजयकाका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे.






