Wednesday, April 22, 2026

Pahalgam Attack : ओल्या जखमेची वर्षपूर्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Pahalgam Attack : ओल्या जखमेची वर्षपूर्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पहलगाम : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांनी आपले प्राण गमावले. आज पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, "गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांचे स्मरण. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत."

एक राष्ट्र म्हणून, आपण दुःखात आणि निर्धारात एकजूट आहोत. भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.

पंतप्रधान मोदींनी निःसंदिग्धपणे सांगितले की, भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला घाबरणार नाही. त्यांनी पुनरुच्चार केला की, दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत आणि देश पूर्ण ताकदीनिशी त्यांचा सामना करेल.

भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, भारतावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृत्याला निर्णायक आणि खंबीर प्रत्युत्तर दिले जाईल. लष्कराने ठामपणे सांगितले की, न्याय नेहमीच मिळेल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

Comments
Add Comment