माेरपीस - पूजा काळे
अपरिमित कौशल्याची कुशाग्र बुद्धी ही मानवाला लाभलेली सर्वात मोठी देणगी होय, जिच्या जोरावर परग्रहावर जाऊन आपण आपला ठसा उमटलेला आहे. मानवी जन्माप्रसंगी वाढणाऱ्या इतर अवयवांबरोबर संवेदना जागृत करत मेंदूच्या बुद्धीची कार्यप्रणाली जोर धरते. अभ्यासाने, कौशल्यपणाला लावून ज्ञानार्जनाद्वारे बुद्ध्यांक वाढवता येतो हा आजवरचा शोधप्रवास ज्याला आधाराची पुष्टी देता येते. ज्ञान मार्गात आवश्यक पर्याप्त खुराकाची मात्रा मेंदूला प्राप्त झाली की, बुद्धीला धार येते. बुद्धीला धार देणाऱ्या स्त्रोतापैकी वाचन हे अतिशय महत्त्वाचे स्त्रोत आहे, ज्याला आपण मनाचे अन्न म्हणूया. मनाच्या अन्नासाठी वाचनासारखा दुसरा मार्ग सध्यातरी नाही. वाचनासाठी पुस्तकांचा विषय महत्त्वाचा मानला जातो. आजच्या एआयच्या काळात वाचनासाठी मार्गदर्शक तक्ते आहेत. सवलती, सोयी-सुविधा वाट पाहत उभ्या आहेत. पुस्तकाच्या वाचनाने, सौहार्दपूर्ण संवादान्वये मानवाचे मानसिक स्वास्थ्य सुधारते. त्याला चालना मिळते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री ही केवळ मैत्री न राहाता त्यातून प्रगतीचे मार्ग खुले होतात. अभ्यासाने ज्ञानाची दालन खुली करणारी पुस्तकं सामाजिक तसचं वैचारिक बैठकीचा आनंद देतात. वाचनालयातील विविध पुस्तके आपल्यासोबत संवाद साधण्यास, आपल्यात परिपक्वता आणण्यास उत्सुक आहेत. तेव्हा येणाऱ्या काळात वाचाल तर वाचाल मोहिमेसाठी मोठी शक्ती कार्यान्वित करायला हवी. पुस्तकांबाबत अनिल अवचट म्हणतात, "अतृप्तीच्या भांड्यात एक थेंब तृप्तीचा मिसळला की, निर्माण होणारं तृप्तीचे दही घट्ट असेल." तसंच पुस्तकांच आहे. पुस्तकांच्या बाबतीत धारणेचा आग्रह धरला की पुस्तकचं काय, पण एखादं महत्त्वाचं सूत्र किंवा वाक्यसुद्धा आपली दिशा ठरवू शकेल. पुस्तकांच्या दुनियेत रमणं काहींना छान जमतं. ज्यांना जमतं ती लोक भाषा, विचार, विषय, संस्कृती पुढं नेण्याचं काम करतील. पुस्तकं वाचून काढण्याचा आणि पुस्तक हाताळण्याचा बुद्धिवर्धक व्यायाम ज्याला उमगेल त्याचा सर्वांगीण सुंदर विकास होईल. "दिसामाजी काहीतरी लिहीत जावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।" रामदास स्वामींची विचारधारा हेचं तर सुचवते. आई, परिवारानंतर सहवासात आलेली माणसं, गुरू, ग्रंथ, शाळा आणि पुस्तक आपल्या जीवनावर व्यापक प्रकाश टाकतात. पुस्तके आपली मित्र असतात. इतरांची पुस्तके वाचताना त्यातून प्रेरणा मिळते. जीवनात काहीतरी मिळवायची उमेद वाढते आणि पुस्तकदिनाच्या निमित्ताने जीवन समृद्ध करणाऱ्या दिशादर्शक मार्गावर नवी मानसिक स्थैर्याची फळी निर्माण होण्याची खात्री पटते. पुस्तकदिनाच्या मूळ उद्दिष्टांचा मागोवा घेता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे वाचकाला वाचनाच्या संधीबरोबर आनंदाचं सूत्र, अपयशाचं संकट आणि निराशेला सामोरं जाण्याचं ध्यैय हिचं पुस्तक देतात. पण प्रोत्साहित व्यक्तींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी इच्छाशक्ती हवी, तेव्हाच वाचक, वाचन आणि पुस्तकांसाठीच्या प्रयत्नाला बळ येईल. पुढे हा विश्वास घेऊन विविध उपक्रमांद्वारे पुस्तक दिन संस्मरणीय करण्याचा कल वाढवावा लागेल. पुस्तकं वाचन रंजक होण्यासाठी स्वागतार्ह मुद्दा म्हणजे... आवडत्या पुस्तकातलं एखादं आवडीचं पात्र निवडून अभिनयातून ते सादर करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून जगण्याच्या मार्गावरील परस्पर संवाद पक्का होऊन लेखकाच्या कलाकृतीला जवळून अनुभवता येईल. पुस्तकांमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा हा एक उत्तम पर्याय होऊ शकेल.
वाचनाने पूर्णत्व येतं. संवादाने सजगता येते तर लिखाणाने अचूकता येण्याची किमया पुस्तकात सापडते. कादंबरी, कथांचे सामायिक वाचन केल्याने वाचनाची आवड वृद्धिंगत होऊन तिच्या कक्षा रुंदावतील. नेहमीच्या जगण्यात फरक पडेल. काय चांगले, काय वाईट याबाबत इतरांना आपण खुलासा करू. वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदींसह विस्तृत श्रेणीतील पुस्तक वाचण्यासाठी आपण इतर वाचकांना प्रोत्साहित करू. विचार करून वाचलेल्या आणि वाचून विचार केलेल्या पुस्तकाद्वारे शिक्षण आणि आनंद दोन्हींचा लाभ घेता येईल. जगभरातील विस्तृत ज्ञानगंगेच्या प्रवाहात सदैव रस असलेल्यांना नवीन क्षेत्रांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तकं परिणामकारक ठरतील. शहाणपणाचा निर्झर वाचनानंद म्हणून जागतिक पुस्तक दिन ओळखला जातो. वाचनामुळे विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्ती सक्षम होऊ शकेल. वाचनाच्या सवयीने इतरांना प्रोत्साहित करण्याचा चांगला मार्ग म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. पुस्तक वाचन असो वा मोबाईल वाचन असो वा संगणकीय वाचन! नाट्य, संगीत, कला, व्यवसाय, उठावदार व्यक्तिमत्त्व विकासात वाचन महत्त्वाची भूमिका बजावते. आपली स्मरणशक्ती, आपला शब्दसंचय, व्याकरणाची शुद्धता सुधारण्यास वाचन मदत करते. पुस्तक आणि वाचक हे दोघे हातात हात घालून आले की साहित्य भरभराटीला येतप; परंतु वाचनापेक्षा प्रतिक्रिया देण्याच्या प्रक्रियेला आजकाल जोर येऊ लागला आहे. वाचक न वाचता उथळ बोलू लागलेत. महत्त्वाचा वेळ इतरत्र घालवून लिहिण्या- वाचण्यावर जणू काही रेघोट्या मारल्या जातात. ग्रंथ, कादंबऱ्या वाचकाविना धूळ खात पडली आहेत. कपाटातल्या पुस्तकांसह बंद पडण्याच्या मार्गावर असलेली वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. वाचनाविना आयुष्य एकांगी उथळ होत चालल्याची जाण कुणाला नाही. दर्जेदार कल्पना, योग्य मतमांडणी, उत्कृष्ट विचार संपुष्टात येत आहे. काही थोडे जण वाचलेले आचरणात आणतात पण अल्पावधीत सोडून देऊन पुन्हा मूळ पदावर येतात. एकवेळ विज्ञान कंदील देईल पण वाचायला तुम्हालाच लागेल ना! पुस्तकी रूपातले प्रश्न, वाचणं आणि वाचवणं किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. कवयित्री दीपा मनमुक्त यांची नुकतीच वाचनात आलेली पुस्तकावरची कविता मन सुन्न करते. त्यातली भीषणता हेलावून टाकणारी आहे.
"पुस्तकांनी केलंय लॉकडाऊन आपल्या कपाटाचं... म्हणतात की आम्ही येत नाही तुमच्या अत्यावश्यक सेवेत, नाहीतरी तुम्ही काय घेतलंत आमच्याकडून? वादांची दुकानं मांडून ठेवलीत तुम्ही नाक्यावर. धर्मग्रंथांतला धर्माचा अर्थही लावत गेलात मतलबानं. इतिहासातून काही शिकण्याऐवजी आम्ही म्हणतो तोच खरा इतिहास म्हणत गेलात तुम्ही. आम्ही सांगत गेलो ज्ञानाची ज्ञानेश्वरी पण तुम्ही भोंदुगिरी केलीत माणुसकीची, संस्कृतीची आणि परमेश्वराचीही... आता तुमच्या सर्वचं वर्तणुकीत कुठे दिसतोय ज्ञानार्जनाचा अंश? घोळक्याघोळक्याने जीवनावश्यक वस्तू घेताना विसर पाडताय नियमांचा. तुमच्याकरता असलेल्या कार्यरत सेवकांचा. टोळीगिरीचं महत्त्वं वाढतयं दिवसागणिक. त्यामुळे तुम्ही खरंच काही नाही मिळवलंय, मला वाचून... आमचीही संख्या विपुल, तसे मतभेदही विपुल. तरी आम्ही मानतो आमच्या विचारांचा सोशल डिसट्ंस. होत नाही आक्रमक शब्दातून शस्त्रातून. एकमेकांना प्रमाण मानून प्रमाणात राहतो आम्ही. पण तुम्ही खरंच काही घेतलंय का आमच्याकडून? त्यामुळे मीचं ठेवू पाहतेय माणसांपासून सोशल डिसटंस... ज्यांना शब्द कळत नाहीत, वाक्यांतला अर्थ कळत नाही, विचारांतील भेद लक्षात ठेऊन एकमेकांच्या विचारांचा आदर करणं समजत नाही अशा वाचकांपासून मी ठेऊ पाहतोय सोशल डिसटंस... कारण... तुकारामांच्या गाथेइतकं बळ नाही उरलंय माझ्यात. जलप्रवाहात पडूनही पतित न होता स्वत:ला पवित्र ठेवण्याचं.
एवढं सगळं पाहता येणाऱ्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त "वाचाल तर वाचाल" विषयी आपण काय विचार करता...?