Wednesday, April 22, 2026

Pankaja Munde : पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी

Pankaja Munde : पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी

मुंबई : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह कोकाकोला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. ‘वसुंधरा रक्षक’ या संकल्पनेला मातृत्वाची जोड देत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, वसुंधरा म्हणजे केवळ पृथ्वी नव्हे, तर आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागतील.

‘वसुंधरा रक्षक अभियाना’च्या माध्यमातून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार केले जाणार आहेत. गावागावांत, वॉर्डावॉर्डात ही चळवळ पोहोचली पाहिजे. हे रक्षक प्रदूषणाविरुद्ध लढतील. प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा कृतींमधून सर्व नागरिकांनीही वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रदूषणाचा परिणाम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची तीव्रता जाणवत नाही. लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून बदलाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगून आजच्या पिढीला पर्यावरणातील बदल समजावून सांगण्यासाठी ‘आज-काल-उद्या’ या संकल्पनेवर आधारित माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जाईल. आजची पिढी तंत्रज्ञानात पुढे आहे; मात्र पर्यावरणाची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. पुढच्या पिढीला संपत्ती नव्हे, तर स्वच्छ हवा आणि पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.

‘महा-आरपीईटी’ अभियानाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर देत ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिथिंक’ या तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अनावश्यक पॅकेजिंग कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्याचा उत्पादकांकडून पुन्हा वापर करण्याची संकल्पना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. राज्यात या प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उत्सर्जन व्यापार योजना इमिशन ट्रेडिंग स्कीमबाबत मंत्री मुंडे यांनी सांगितले की, कार्बन ट्रेडिंगप्रमाणेच सल्फर डायऑक्साईड उत्सर्जन नियंत्रणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उद्योगांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.

वसुंधरा रक्षक अभियानाअंतर्गत वसुंधरा रक्षक व्हॉट्सअप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. या कम्युनिटीद्वारे या अभियानामध्ये सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात क्यूआर कोडद्वारे मंत्री पंकजा मुंडे, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सचिव जयश्री भोज यांनी या कम्युनिटीमध्ये सहभाग नोंदवत वसुंधरा रक्षक झालो असल्याचे जाहीर केले. तसेच वसुंधरा अभियानाच्या लिंक व क्यूआर कोडद्वारे या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा