चला, पुन्हा जोडू या मातीशी नाते!

जागतिक वसुंधरा दिन


जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने यंदा 'आपली शक्ती, आपला ग्रह' ही संकल्पना जगभर राबवली जात आहे. केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पृथ्वीला हिरवेगार कसे ठेवता येईल? देशी बियाणे, सेंद्रिय कापूस आणि प्लास्टिकमुक्तीच्या वाटेवरचे आपले पाऊल किती महत्त्वाचे आहे? जाणून घेऊ या या लेखातून...


कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पॉलिस्टर महागले आणि कापसाची मागणी वाढली. काही वर्षांपूर्वी कापसाचे ‘बीटी बियाणे’ (जनुकीय सुधारित) विकसित झाले. या बियाणांमुळे उत्पादन वाढत असले तरी, कालांतराने त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. बीटी कापसाचा पालापाचोळा जमिनीत कुजल्यावर मातीतील सूक्ष्म जीवाणूंवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते आणि मातीचा कस कमी झाल्याने रासायनिक खतांचा वापर अनिवार्य ठरतो, ज्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. तसेच, बेकायदा 'एचटी बीटी' बियाणांमुळे ‘ग्लायफोसेट’सारख्या तणनाशकांचा वापर वाढून पर्यावरणास घातक तणे तयार होतात. कापूस म्हणजे “पांढरे सोने”; सिंधू संस्कृतीच्या अभ्यासानुसार भारतात सुमारे ७००० वर्षांपासून कापूस पिकवला जात आहे. हे 'कापूस पुराण' मांडण्याचे कारण म्हणजे २२ एप्रिल रोजी साजरा होणारा 'वसुंधरा दिवस'. पृथ्वीच्या संरक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जनजागृती करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस.


आज आपण वापरतो ते कपडे खरोखरच पर्यावरणस्नेही आहेत का? वस्त्रोद्योगात ७०,००० हून अधिक कृत्रिम रसायने वापरली जातात, त्यापैकी केवळ २ टक्के सुरक्षित आहेत. 'पर्यावरणस्नेही कापड' म्हणजे ते उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक असावे. कॉर्पोरेट कंपन्यांनी ग्राहकांचा जो गोड गैरसमज करून दिला आहे, त्याला ‘बाहेर बरवा, आत हिरवा’ ही म्हण चपखल लागू पडते. या क्षेत्रात श्रीरंग देवबा लाड यांनी स्वतःचे नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित केले, ज्याबद्दल त्यांना २०२६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कापसाच्या फांद्यांचा सखोल अभ्यास करून शेंडा खुडणी, अतिघन लागवड आणि ठिबक सिंचन यांसारख्या नैसर्गिक पद्धती अवलंबल्या. यामुळे बोंडाचे वजन वाढले, किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि मातीचा ओलावा टिकून राहिल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला.


दुसरे उदाहरण व्ही. आर. अनंथू यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना जनुकीय बियाणे व रसायने सोडून शाश्वत देशी बियाणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. देशी कापसाचे ‘सरळ वाण’ संरक्षित करून, सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन ते कापड विघटनापर्यंतची सर्व प्रक्रिया नैसर्गिक ठेवली. कुशल कामगारांकडून हातमागावर विणलेल्या या कापडाला अपराजिता, हळद, मंजिष्ठा आणि पळस यांसारख्या नैसर्गिक रंगांनी सजवले जाते. अगदी बटणेही नारळाच्या करवंटीपासून बनवली जातात. हे कापड नैसर्गिक असल्याने त्याचे विघटनही सहज होते, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने वसुंधरेचे देणे वसुंधरेला परत दिले जाते.


वसुंधरा दिवसाची सुरुवात १९७० मध्ये अमेरिकेत झाली. युनेस्को परिषदेत शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर, सिनेट सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी या दिवसाची अधिकृत सुरुवात केली. आज १९० हून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो.


सध्या आपली पृथ्वी हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यांसारख्या संकटांचा सामना करत आहे. निसर्गाचे रक्षण ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ ही आहे. यात 'आपली शक्ती' म्हणजे प्रत्येक मानवाचे वैयक्तिक योगदान. आपण पुढील गोष्टी करू शकतो.


१. वृक्षारोपण : केवळ झाडे लावू नका, ती जगवा.
२. प्लास्टिक त्याग : एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालून कापडी पिशव्या वापरा.
३. बचत : पाणी आणि विजेचा अपव्यय टाळा.
४. कचरा व्यवस्थापन : ओला व सुका कचरा वेगळा करून 'पुनर्वापर' संस्कृती रुजवा.
५. कमी प्रदूषण : जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरा किंवा चालत जा.


निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, पण हाव नाही," हे महात्मा गांधींचे विचार आजही लागू होतात. पृथ्वी आपली माता आहे आणि वाढत्या स्वार्थामुळे आपण तिचे शोषण करत आहोत. वसुंधरा दिवस हा केवळ एक दिवसाचा सोहळा न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. आपली पृथ्वी हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू या.

Comments
Add Comment

साठवूया पाणी, वाचवूया पुणे

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असतानाच,

विदर्भात राष्ट्रपतींचा प्रेरणादायी दौरा

वार्तापत्र : विदर्भ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर-वर्धा दौऱ्याने विदर्भात विशेष लक्ष वेधले, विविध

पुन्हा बारगळले!

महिला आरक्षण आणि जात आरक्षण या दोन्हींचंही प्रतिबिंब २०३४ च्या निवडणुकीत दिसेल. महिलांच्या आरक्षणाला तोपर्यंत

पुन्हा चंद्रमाच्या दिशेने

५३ वर्षांनी मानवाने पुन्हा चंद्राच्या दिशेने पाऊल टाकले. यावेळी ‘नासा’ची ‘आर्टेमिस २’ ही मोहीम आहे. या

गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम - सामान्य माणसाच्या घरात पोहोचू लागलेले इराण युद्धाचे परिणाम!

विनय जोशी, आयसीआरआर - संघर्ष संशोधन आणि निराकरण संस्था इराणवर अमेरिकन, इस्रायली हल्ले सुरू होऊन आता महिना होत आला.

विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय

वार्तापत्र : विदर्भ विदर्भातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत