मायेचा जिव्हाळा जपणारी गावाकडची माणसं

धावपळीच्या आयुष्यात हरवलेला माणूस जेव्हा थकून जातो, तेव्हा त्याला आठवण येते ती आपल्या गावच्या मातीची आणि तिथल्या मायेच्या सावलीची. शहर आपल्याला सोयी-सुविधा देतं, पण गाव आपल्याला 'जिव्हाळा' देते.


आजही आपल्या गावाकडच्या माणसांचा विचार केला, तर ती आजही मायेचा जिव्हाळा जपणारी आहेत, हे गावी गेल्यावरच प्रकर्षाने जाणवते. पोटापाण्याच्या आणि उदरनिर्वाहाच्या साधनांच्या अभावामुळे आपण शहरात आलो, हे वास्तव असले तरी आपले मन मात्र कायम गावाकडेच असते. शहरात राहूनही सणासुदीला ज्यांना शक्य असते, ते गावी जाऊन सण साजरा करतात आणि पुन्हा रोजीरोटीसाठी शहरात परततात. इतकेच नाही, तर मुलांची वार्षिक परीक्षा संपली की कुटुंबीयांसोबत उन्हाळ्यात दहा-पंधरा दिवस आपल्या गावी आवर्जून राहून येतात. या काळात गावच्या माणसांच्या सहवासात राहिल्यावर समजते की, ही माणसे आजही आपली परंपरा आणि निसर्गाशी नाते जपून आहेत.


गावची माणसे अत्यंत कष्टाळू असतात. भावकीत कितीही गट-तट असले तरी संकटाच्या वेळी हीच माणसे सावलीसारखी पाठीशी उभी राहतात. वरून फणसासारखी काटेरी वाटली, तरी ही माणसे आतून गऱ्यासारखी गोड असतात. ही माणसे आपल्या मातीशी प्रामाणिक असतात. आपापसात भांडणे झाली, तरी सुख-दु:खाच्या प्रसंगी ती एकत्र येतात. काबाडकष्ट करून घरी आलेल्या पाहुण्याला ती 'काय देऊ?' असे शहरातल्या लोकांसारखे विचारत नाहीत, तर घरात जे काही असेल ते आनंदाने समोर ठेवतात. घरात साखर नसली तरी मागच्या दाराने शेजाऱ्याकडून ती आणून पाहुण्याला चहा देतील, पण त्याला त्याची जाणीवही होऊ देणार नाहीत. कितीही संकटे आली तरी शहरातील नातेवाइकांना न कळवता आहे त्यात समाधान मानणारा हा गावचा माणूस आहे.


कोविड काळात या माणसांना १४ दिवस घरापासून दूर राहावे लागले, याची सल आजही त्यांच्या मनात आहे. मध्यंतरी गॅस आल्याने चुलीकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र आता गॅसच्या वाढत्या किमतींमुळे पुन्हा चुलीला चांगले दिवस आले आहेत. याचे श्रेय गावच्या माणसांनाच जाते, कारण त्यांनी चुलीचे अस्तित्व टिकवून ठेवले. आजही कोकणात येणारे पर्यटक चुलीवरच्या जेवणालाच जास्त पसंती देतात.


आता चातक पक्ष्याप्रमाणे गावची माणसे चाकरमान्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची वाट पाहत आहेत. पूर्वी पत्र आल्यावर चाकरमानी येणार हे समजायचे आणि गावची मंडळी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायची. घरापुढचे अंगण सारवून रांगोळ्या काढणे, वाट साफ करणे, घर नीटनेटके ठेवणे ही कामे हौसेने केली जायची. स्वतःच्या झाडाला आंबे-फणस नसले तरी शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून ते मिळवून पाहुण्यांची सोय केली जायची. गावी आल्यावर दुसऱ्याच दिवशी फणसाची सुकी भाजी (जनता भाजी) पोटभर खिलवली जाते. चाकरमान्यांनी रानावनात जाऊ नये, त्यांनी वर्षभर शहरात कष्ट केले आहेत म्हणून त्यांनी घरीच आराम करावा, असा वडिलकीचा सल्ला ही माणसे देतात. "पोरांना सांभाळा, काट्याकुट्यात पाठवू नका, बाहेरचे पाणी पिऊ नका, चुलीवर गरम केलेलेच पाणी प्या" असे प्रेमळ सल्ले तिथे मिळतात.


पुन्हा शहरात परतीच्या प्रवासाला निघताना सुकी मासळी कपड्याच्या पिशवीत बांधून द्यायला ही माणसे विसरत नाहीत. त्यासाठी गावात येणाऱ्या मासेवालीला आधीच सांगून ठेवले जाते. त्यासोबतच एखाद-दोन किलो घरचे तांदूळ न सांगता पिशवीत भरले जातात. हे सर्व केवळ मायेपोटी केले जाते. शहराच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा गावच्या जीवनात नात्यांचा ओलावा जास्त असतो. शेजाऱ्याकडे पाहुणे आले तरी त्यांची विचारपूस करणारी ही माणसे आजही एकत्र कुटुंब पद्धती टिकवून आहेत.


आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हे त्यांचे सूत्र असते. सार्वजनिक कामासाठी ही मंडळी मतभेद विसरून एकत्र येतात. सणादिवशी एकमेकांना गोडधोड वाटतात. ताटातले जेवण शेजाऱ्याला नेऊन देण्याची संस्कृती आजही तिथे जिवंत आहे. जेव्हा चाकरमानी पुन्हा शहरात जाण्यासाठी निघतात, तेव्हा त्यांचे सामान उचलण्यापासून त्यांना गाडीपर्यंत सोडायला जाण्यापर्यंत ही माणसे सोबत असतात. "पुढच्या वर्षी नक्की या, पोरांना सांभाळा, पोहोचल्यावर फोन करा," असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. कारण, ही केवळ माणसे नसून मायेचा आणि प्रेमाचा ठेवा जपणारी माणुसकीची प्रतीके आहेत. अशी ही मायेचा जिव्हाळा जपणारी गावाकडची माणसं आजही माणुसकी जिवंत ठेवून आहेत.


रवींद्र तांबे

Comments
Add Comment

Amravati Paratwada परतवाड्यात मैत्रीआडून भयंकर अत्याचार

वार्तापत्र : विदर्भ  अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे गेल्या तीन आठवड्यांपासून महिलांवरील कथित लैंगिक

हंगेरीतील सत्तांतराचा अमेरिकेला धक्का

ऑर्बन यांनी विरोधकांना व्यक्ती म्हणून नव्हे, तर व्यवस्था म्हणून उभे केले. ते केवळ युरोपियन महासंघाचे केंद्र

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाकडे

वार्तापत्र : मराठवाडा  अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता

वाचनाची अनुभूती: माहितीपासून प्रज्ञेकडे

पुस्तके ही मानवी संस्कृतीचा जिवंत वारसा आहेत. 'वाचाल तर वाचाल' हे सूत्र आजही कालातीत आहे; परंतु आजच्या धावपळीच्या

Sinhastha Kumbh Mela : विकासाचा महाकुंभ की राजकीय आखाडा?

वार्तापत्र : उत्तर महाराष्ट्र  'सिंहस्थ कुंभमेळा' अवघ्या १५ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३५ हजार कोटींच्या विकास

चला, पुन्हा जोडू या मातीशी नाते!

जागतिक वसुंधरा दिन जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने यंदा 'आपली शक्ती, आपला ग्रह' ही संकल्पना जगभर राबवली जात