मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, ही सुरुवात झाली असली तरी याबाबतच्या तिन्ही भागांमधील कामांच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, कोणत्याही कंपन्या पुढे येत नसल्याने दोन कंपन्यांनीच यामध्ये भाग घेतला असून त्यांना या तिन्ही भागांचे कंत्राट देण्यात आले आहे. पण या कंपन्यांना नाल्यातील गाळ काढण्याचा कोणताही अनुभव नाही, तसेच त्यांच्याकडे मशिनरी नाही, मग पावसाळ्यापूर्वी ते मिठी नदीतील गाळ कसा काढून पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मिठी नदीस नाले सफाईच्या कामांचा अहवाल प्रत्येक सात दिवसांनी स्थायी समितीला सादर करण्यात यावा अशी निर्देश अध्यक्षांनी प्रशासनाला दिले.
मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांची चौकशी झाल्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करून नव्याने एक वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये पवई फिल्टरपाडा ते शिक्षक कॉलनी, शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर ब्रीज आणि बीकेेसी कनेक्टर ब्रीज ते माहिम ऑऊटफॉल टेल पर्यंत तीन भागांमध्ये विभागून याची निविदा मागवली होती. या तिन्ही भागांतील निविदेत कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे निविदा अटी रद्द केल्या, त्यानंतरही केवळ दोन कंपन्यांनीच भाग घेतला होता. त्यानुसार या कंत्राटदारांच्या निवडीचा प्रस्ताव आला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी मिठी नदीच्या तळाशी खडक असून त्या फोडण्यात आला नसल्याने पुरपरिस्थती झाली आहे, यातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या मिठीनदीच्या कामाला सुरुवात झाली असून सध्या या कंत्राटदारांकडे यांत्रिक सुविधा नसल्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेला गाळ ते कसा काढणर असा प्रश्न उपस्थित केला. या दोन्ही कंपन्यांना अनुभव नसून मिठी नदीच्या कामांसाठी ज्या कंपन्या होत्या, त्यांचे कंत्राट रद्द केले, त्या कंपन्या इतर विभागांमध्ये काम करत आहेत. त्यामुळ प्रत्येक सात दिवसांनी या कामांचा प्रगती अहवाला सादर करण्यात यावा,असे त्यांनी सांगितले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी मिठी नदीचे १२ ऑऊट फॉल असून त्यातील ४ ऑऊट फॉल हे खासगी जागेत आहेत आणि ते महापालिका साफ करत नाहीत. मग ही जबाबदारी कुणाची असा सवाल करत क्रॉनिट स्पॉटकडे जर आपण नाही बघितले तर आपण मिठी नदीपासून निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीकडे कसे पाहणार असा सवाल कला. एमआयएमचे कुरेशी यांनी मिठी नदीची सफाई योग्य न केल्यास त्यांना ३०० टक्के दंड आकारण्यात यावा अशी मागणी केली. तर तुलिफ मिरांडा यांनी हरित लवादाने लागू केलेला महिन्याला १० हजारांचा दंड अजुनही आकारला जातो का असा सवाल केला. शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी एम पूर्व विभागांत अजुनही नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नसून त्यांच्याकडे मशिनरीज न आल्याने त्यांनी कामाला सुरुवात केली नसल्याचे सांगितले.
भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी ११ महिन्यांसाठी हे कंत्राट आहे, मग एप्रिलमध्ये कामाला सुरुवात झाली, तर ११ महिने कसे होतात असा सवाल केला. तर माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी रस्त्यांची कामे, संरक्षक भिंत उभारण्याचे करणारे मिठी नदीतील गाळ कसा काढणार असा सवाल केला. मिनाक्षी पाटणकर यांनीही पूर्व उपनगरातील चेंबूरमधील नाल्यांची सफाई न झाल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.
यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे नाल्यांची तसेच मिठी नदीस नदींच्या सफाईकडे लक्ष ठेवून आहोत असे सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी परिमंडळ पाचमधील नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात झालेली नाही, याची माहिती मलाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावा तसेच यापुढे स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत सात दिवसांनी नालेसफाईच्या कामांचा अहवाल दिला जावा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पवई फिल्टरपाडा ते शिक्षक कॉलनी
कंत्राटदार : प्रशांत प्रकाश लाड
कंत्राट किंमत : ९.७५ कोटी रुपये
शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर ब्रीज
कंत्राटदार : तुळजा भवानी कंस्ट्रक्शन
कंत्राट किंमत : १०. ४६ कोटी रुपये
बीकेेसी कनेक्टर ब्रीज ते माहिम ऑऊटफॉल टेल
कंत्राटदार : तुळजा भवानी कंस्ट्रक्शन
कंत्राट किंमत : ९. ८९कोटी रुपये






