Tuesday, April 21, 2026

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.

दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.

दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >