बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत महायुतीने सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अजित पवारांची चुलत बहीण या नात्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला. शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रचार करणे टाळले पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असल्याचे भावनिक आवाहन बारामतीकरांना केले. एकनाथ शिंदेंनीही कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीच्या मतदारांना केले.
काल शरद पवारांनी फोन करून आघाडीचा पाठिंबा सुनेत्रा पवारांनाच असल्याचे सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या प्रचारसभेत दिली. सभेत बोलताना सुनेत्रा पवारांना जाहीर केलेल्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारही ठामपणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रचारसभेवेळी अजित पवारांवील एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. ही फिल्म बघताना सुनेत्रा पवारांचे अश्रू दाटून आले होते. अजित पवारांनी बारामतीच्या तीन पिढ्यांना एका कुटुंबासारखं जपलं. राज्याचं काम करणाऱ्या अजित पवारांनी बारामतीविषयीची आपुलकी कायम जपली. अशा या दादा माणसाच्या आकस्मिक जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी जशी कुटुंबानं, दोन्ही मुलांनी साथ दिली तशी बारामतीकरांसह पूर्ण राज्यानंही काळजी घेतली. सर्वांनीच माझ्यावर आणि मुलांवर मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
शरद पवार आजारी
शरद पवारांनी तब्येत बरी नसल्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणे टाळले. पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तब्येत साथ देत नसल्यामुळे इतक्यात बारामतीत येणे शक्य नाही पण बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडू नये असे भावनिक आवाहन केले आहे.






