Thursday, July 23, 2026

Maharashtrachi Hasya Jatra : स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा मानाचा मुजरा

Maharashtrachi Hasya Jatra :  स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा मानाचा मुजरा

मुंबई(Mumbai) : नेहमीच काहीतरी वेगळं, नावीन्यपूर्ण आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारं सादर करणारी सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यावेळी एका अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी स्किटद्वारे ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना अभिवादन करणार आहे. समीर चौगुले यांनी लिहिलेल्या या विशेष स्किटमध्ये समीर चौगुले, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, श्रमेश बेटकर आणि चेतना भट हे कलाकार सहभागी झाले आहेत. सुमनताईंच्या अजरामर गीतांची सुंदर वीण या स्किटमध्ये गुंफण्यात आली असून, त्यांच्या सुरेल कारकिर्दीला आणि समृद्ध संगीत वारशाला हा एक अनोखा सलाम आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि संस्मरणीय स्किट्सपैकी हे एक स्किट ठरणार आहे.(Marathi entartainmenat News)

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत हजारो गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मधुर, निर्मळ आणि भावपूर्ण आवाजाने अनेक दशकं संगीतविश्व समृद्ध केलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले असून, त्यांच्या योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या गाण्यांचा सुवास आजही तितकाच ताजा आहे आणि प्रत्येक पिढीला भावतो. १३ भाषेतून ३ हजार पेक्षा अधिक गाणी सुमन ताईंनी गायली आहेत.

या स्किटनंतर संपूर्ण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' परिवार सुमनताईंना उभं राहून मानवंदना देतो. त्यांची गाणी ऐकताना कलाकारांसह उपस्थित प्रत्येकजण भावूक होतो आणि वातावरण अक्षरशः स्वरांनी भारावून जातं. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर यांनीही या विशेष सादरीकरणाचं कौतुक करत म्हटलं, "महाराष्ट्राची हास्यजत्रा हा फक्त विनोदाचा कार्यक्रम नाही, तर हा सर्वांगीन, सुंदर आणि समृद्ध कार्यक्रम आहे. या मंचावर काहीही घडू शकतं आणि सुमन कल्याणपूर यांना वाहिलेली ही आदरांजली म्हणजे खरंच एक अल्टिमेट ट्रिब्यूट आहे.(Maharashtrachi Hasya Jatra)

यावेळी प्रसाद ओक यांनी या सादरीकरणाचं भरभरून कौतुक करत म्हटलं, "एखाद्या कलाकाराला दिलेली इतकी अप्रतिम आणि हृदयस्पर्शी आदरांजली मी आजवर कधीच पाहिली नव्हती." हास्य, संगीत, भावना आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवायचा असेल, तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा हा विशेष भाग नक्की पाहा. स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर आठवणींना उजाळा देणारा हा अविस्मरणीय क्षण आपल्या संपूर्ण कुटुंबासह अनुभवायला विसरू नका, फक्त सोनी मराठीवर.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >