Saturday, July 18, 2026

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे

कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक राज कपूर एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्या समारंभातील मंचावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक संगीतकार एक गीत गात होते. संगीतकाराने स्वरबद्ध केलेले ते गीत ऐकून राज कपूर कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी त्या गीताच्या आधारावरच चक्क एक चित्रपट निर्माण केला. तो चित्रपट अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी ठरला.

राज कपूर केवळ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकच नव्हते, तर संगीतासहित चित्रपटाच्या प्रत्येक अंगात त्यांनी नैपुण्य मिळविले होते. ते कोणाकडूनही संगीत शिकलेले नव्हते तरीही त्यांना संगीताची उत्तम जाण होती. राज कपूर आपले पुत्र रणधीर यांच्यासमवेत दिल्लीला एका विवाहासाठी गेले होते. त्या समारंभात संगीत दिग्दर्शक रवींद्र जैन मंचावर “एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा...” हे गीत गात असल्याचे राज कपूर यांनी पाहिले. रवींद्र जैन यांचे गीत गाऊन पूर्ण होताच राज कपूर यांच्या तोंडून ‘व्वा’ असे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडले! रवींद्र जैन यांची राज कपूर यांनी वाहवा केल्यावर समारंभाला उपस्थित राहिलेल्या अन्य पाहुण्यांनीही संगीतकार जैन यांची वाहवा केली. रवींद्र जैन यांना राज कपूर म्हणाले, दादू हे गीत मला पुन्हा एकदा ऐकवा! राज कपूर यांनी तशी विनंती केल्यामुळे जैन यांनी “एक राधा एक मीरा” हे गीत पुन्हा एकदा गायिले. गीत गाऊन पूर्ण होताच रवींद्र जैन यांना राज कपूर यांनी विचारले, हे गीत कोणत्या चित्रपटातील आहे? जैन म्हणाले, हे माझे खासगी गीत आहे. जैन यांचे उत्तर ऐकून राज कपूर त्यांना म्हणाले, हे गीत आता माझे झाले! राज कपूर यांनी तसे म्हणताच रवींद्र जैन यांना अत्यानंद झाला.

दुसऱ्या दिवशी मुंबईला परतल्यावर रणधीर कपूर यांना राज कपूर म्हणाले, की आज संध्याकाळी काही लोक तुझ्यासमवेत भोजनासाठी आपल्या निवासस्थानी येणार आहेत. घरात सांगून ठेव, की आठ-दहा लोक असतील आणि मीही येतोय. संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी तबला, सारंगी आणि हर्मोनिअमसहित अन्य वाद्येही येऊ लागली तेव्हा रणधीर यांची पत्नी बबिता यांनी रणधीरना विचारले, की आपल्या घरात हे काय चालले आहे? तेव्हा घरात सतरंजी-चादर पसरून त्यावर तक्के लावता लावता रणधीर त्यांना म्हणाले, पापांसहित काही लोक आपल्याकडे येणार आहेत.

काही वेळाने राज कपूर यांच्याबरोबर रवींद्र जैन यांचे आगमन झाले. मद्यपान सुरू होताच जैन यांना राज कपूर म्हणाले, दादू माझे गीत जरा माझ्या मुलांना ऐकवा. वडिलांनी जैन यांना तशी विनंती करताच रणधीर कपूर मनातल्या मनात म्हणाले, आतापर्यंत पन्नास वेळा ऐकले आहे हे गीत; आता पुन्हा एक्कावन्नाव्या वेळी ऐकावे लागणार आहे! गीत संपताच रणधीर यांना राज कपूर यांनी विचारले, तुझ्याकडे चेकबुक आहे? रणधीर म्हणाले, हो आहे. राज कपूर म्हणाले, जा, रवींद्र जैन यांच्या नावाने पंचवीस हजार रुपयांचा एक धनादेश (चेक) तयार करून घेऊन ये. रणधीर तो धनादेश घेऊन येताच रवींद्र जैन यांना राज कपूर म्हणाले, आपण पुन्हा एकदा माझे गीत गावे. गीत ऐकल्यावर तो धनादेश जैन यांना देण्यास रणधीर यांना राज कपूर यांनी सांगितले. रणधीर यांनी जैन यांच्या हाती तो धनादेश देताच जैन यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या! केवळ आपले एक गीत ऐकून राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी आपल्याला करारबद्ध केले आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

या प्रसंगानंतर दोन दिवसांनी रणधीर कपूर ‘आरके’ चित्रपट संस्थेच्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी राज कपूर दिसले नाहीत. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारले की, राजसाहेब कोठे आहेत? तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले, की रवींद्र जैन आणि अन्य चार-पाच जणांसमवेत राजसाहेब लोणी काळभोरच्या ‘राजबागे’त गेले आहेत.

चार दिवसांनी राज कपूर मुंबईला परतल्यावर रणधीर कपूर यांना म्हणाले, मी गेल्या चार दिवसांमध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे संपूर्ण संगीत तयार केले आहे हे ऐकून तुला आनंद होईल आणि अभिमानही वाटेल. वडिलांनी असे सांगताच रणधीर यांनी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारले, पण चित्रपटाची कथा काय आहे? त्यावर सरळ उत्तर न देता राज कपूर म्हणाले, की पुढील आठवड्यात मी पुन्हा लोणीला जाणार आहे. सर्वसाधारणपणे निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटाची कथा निश्चित झाल्यावरच त्याचे संगीत तयार करतात; परंतु ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाची कथा लिहिली जाण्यापूर्वीच त्याचे संगीत तयार करणे हे केवळ राज कपूर यांच्यासारखी व्यक्तीच करू शकत होती!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा