Saturday, April 18, 2026

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प लातूर शहरातील नांदेड रोड परिसरात उभारण्यात येणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून, सुमारे पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाच्या प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पूर्वी जागेअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र पालकमंत्री भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय अडथळे दूर केले आणि या कामाला गती दिली.

रुग्णालयासाठी सुमारे १० एकर जागेवर बांधकाम होणार असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अपघात विभाग, एक्स-रे, सीटी स्कॅनसह विविध अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. भविष्यात या रुग्णालयाचा विस्तार करून ५०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री भोसले यांनी सांगितले की, “लातूर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकालीन आरोग्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा केवळ १०० खाटांचा प्रकल्प नसून भविष्यातील मोठ्या आरोग्य सुविधेची ही सुरुवात आहे. शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देत हे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभले असून, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा