- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर
मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागांमध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, १९ एप्रिलपर्यंत पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशामध्ये १७ ते १९ एप्रिल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि रायलसीमामध्ये १७ व १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालयमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशीच हवामान परिस्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये राहील. अरुणाचल प्रदेशात १६ ते १९ एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा प्रशासन सज्ज
विदर्भात उष्णतेची लाट, पारा ४४ अंश सेल्सिअसवर
सध्या विदर्भात उष्णतेची लाट असून पारा ४४ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनने सर्व आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहे. उष्माघाताचा रुग्णांनसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या कोल्डवॉर्ड मध्ये उष्मघाताच्या रुग्णांसाठी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कुलर, एसी, कोल्ड बाथ ठेवण्यात आले असून सोबतच पुरेसा औषध पुरवण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांनी सांगितले.
आज आणि उद्या पुण्यातील तापमान वाढणार असून १७ एप्रिलला पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. पुण्यातील तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. १८ आणि १९ एप्रिलला पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा शहरात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे.
हे करू नका…
दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहायड्रेट होते.
उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
पार्किंगमधील वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना ठेवू नका.
बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
हे करा…
तहान लागली नसली तरी पाणी प्या
सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
प्रवासात पाणी सोबत ठेवा.
आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
प्रशासनाला कोणत्या सूचना?
प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे
जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर द्यावा.
शाळांना सूचना देणे, गरजेनुसार शाळांच्या वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.
जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली आणि पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत आणि ORS उपलब्ध ठेवावे. तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे.
कामगार, शेतकरी आणि बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे. नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.






