आशाताईंची सांगीतिक श्रीमंती!

उत्तरा केळकर ज्येष्ठ गायिका


एक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आशाताईंनी संगीतक्षेत्रावर गेली ऐंशी वर्षे राज्य केले. त्याच वेळी त्यांचा मनमिळाऊ पण कणखर स्वभावही लोकांची मने जिंकत होता. आयुष्यातील चढउतारांमुळे येणाऱ्या कटुतेला थारा न देता कलेच्या पूजनामध्ये आयुष्य खर्चिल्यामुळे आशाताई आज थोर गायकांच्या पंगतीमध्ये जाऊन बसल्या. त्यांची आठवण जागवणारा लेख.


कोणत्याही कलाकाराच्या कारकीर्दीचा आलेखाचा परीघ फार मोठा असतो. त्यातच आशा भोसलेंसारख्या असामींची कारकीर्द एका लेखात बसवणे जवळपास अशक्यच; तरीही एखादे वेळी लहान तोंडी मोठा घास घेत आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या कलावंताबाबत लिहिण्याची संधी मिळते. आशाताईंना नव्वद वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली होती. आपल्यापैकी अनेकांचे आयुष्यच उणेपुरे ७५ वर्षांचे असते.


आशाताईंची तर कारकीर्दच तितकी! आपल्यातील प्रत्येकानेच आशाताईंच्या गाण्यांचा आस्वाद घेतला. त्यांच्या सुरांनी कधी आनंद दिला तर कधी डोळा पाणी आणले! एखाद्या कलाकाराच्या गायकीने संपूर्ण देशाच्या मनात घर होऊ शकते हे आपण याची देही याची डोळा अनुभवले ते आशाताईंमुळे. आशाताईंच्या जन्माने संगीत क्षेत्र श्रीमंत झाले. त्यांच्या गायकीबद्दल लिहावे तितके कमी आहे, पण एक व्यक्ती म्हणून आशाताईंचे समोर आलेले पैलू उलगडायचा हा प्रामाणिक प्रयत्न.


आजपर्यंत विविध कारणांमुळे आशाताईंना भेटण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या दिलखुलास आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्वातील अनेक बारकावे समोर आले. आशाताईंबद्दल सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या अजूनही तरुण आहेत. त्या दिसतात तरुण, राहतात तरुण; पण त्यांच्या आचरणात शेवटपर्यंत चिरतरुण भाव पहायला मिळाले. नुकतीच त्यांच्या मागील वर्षीच्या वाढदिवसाची व्हिडीओ क्लिप बघत होते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले.


त्यातच आशाताई नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईमध्ये कार्यक्रम करणार आहेत हे तेव्हा समजले तेव्हा मी अचंबित झाले होते! वयाची नव्वदी गाठणार म्हटल्यावर थकलेल्या, घरात झोपून राहिलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पण आशाताईंनी जणू ‘म्हातारपणा’ची व्याख्याच बदलली. आशाताई शेवटपर्यंत एकदम टापटीप राहत, ग्रेसफुल दिसत. नव्वद वर्षांची एवढी उत्साही व्यक्ती मी कधी पाहिली नाही.


त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत खूप चांगली होती. त्यांना प्रत्येक गाण्याच्या ओळी आठवतात. त्याचबरोबर विविध गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी घडलेले किस्से, गंमतीजमतीही त्यांना व्यवस्थित आठवत. एका व्हिडीओमध्ये ‘मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे’ असे त्या म्हणाल्या. तेव्हा हे विधान किती खरे आहे याची क्षणार्धात प्रचिती आली. त्यांनी इंडस्ट्रीमधील बदलाचे वारे लीलया झेलले आहेत.


मूळ गाण्यांची नजाकत जपण्यापासून रिमिक्सच्या जमान्यापर्यंत त्यांनी संगीतक्षेत्रात झालेला प्रत्येक बदल अगदी जवळून अनुभवला. संगीतक्षेत्राशी निगडीत प्रत्येक कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्या कारकीर्दीमधील चढउतार आशाताईंनी खूप जवळून बघितले. त्यातील अनेकांना वेळप्रसंगी प्रोत्साहन दिले. मलाही कारकीर्दीच्या सुरुवातीला आशाताईंनी खूप प्रोत्साहन दिले होते. माझे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. मध्यंतरी एकदा आशाताईंवर लिहायची संधी मिळाली.


तेव्हा मी लिहिलेला लेख फोनवर वाचून दाखवते असे म्हटल्यावर त्यांनी साफ नकार दिला. ‘माझ्यासमोर बसून लेख वाचून दाखवायचास’ असा आग्रह धरत मला घरी बोलावले! नंतर विविध कारणांमुळे त्यांच्याकडे जाणे-येणे होत राहिले, हे माझे भाग्यच.


आशाताईंकडून सगळ्यात प्रकर्षाने शिकण्यासारखी बाब म्हणजे जगण्यामागची प्रेरणा! आजवरच्या आयुष्यात त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला. डोळ्यांदेखत दोन मुले देवाघरी गेली. आर्थिक स्थैर्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. लक्ष्मीचा वरदहस्त असला तरी वयानुसार आलेल्या समस्या कोणाला चुकल्या आहेत? वयाची नव्वदी गाठूनही प्रत्येक समस्येला हसतमुखाने सामोरे जाणे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते, असे मला वाटते.


‘सलाम’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताईंकडून खूप काही शिकायला मिळाले. आशाताईंच्या कारकीर्दीवर अवलंबून असलेल्या या कार्यक्रमासाठी अर्थातच त्यांची परवानगी घेतली. परवानगीसोबत त्यांनी वरदहस्तही दिला असे म्हणायला हरकत नाही. आशाताईंनी गायलेली गाणी म्हणण्याचा प्रयत्न करणे हा गळ्याचा व्यायाम आहे, या विधानाशी प्रत्येकच गायक सहमत असेल. पूर्वीच्या गाण्यांमधील गोडवा आणि नजाकत आता कुठे तरी हरवली आहे, असे वाटल्यावाचून रहावत नाही.


पूर्वी गाण्यांच्या चालीमध्ये काही अवघड जागा असत. त्या जागा गायकांची खासियत म्हणून ओळखल्या जात. आशाताईंचे संपूर्ण गाणेच अशा जागांनी भरलेले असे. सध्या चांगल्या कसदार चालींचे प्रमाण कमी झाले आहे. काही नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत, पण प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे अशा वेळी जुन्या गाण्यांच्या चाली, संगीतकार, गायक-गायिका यांच्याविषयी कृतज्ञता वाटत राहते. आशाताईंनी मिळालेल्या प्रत्येक गाण्याचे सोने केले. एखाद्या सुमार चालीचे गाणेही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते.


त्यांची गाणी गाताना गळ्याचा आणि कलेचाही व्यायाम होतो. त्यामुळे मी ‘सलाम’ या कार्यक्रमामध्ये आशाताईंची गाणी म्हणण्याचा भाबडा प्रयत्न केला. त्यांनी गायलेली गाणी हीसुद्धा एक मोठी शिकवणी आहे, हे गाताना समजते. त्यांनी अजरामर केलेली गाणी शंभर टक्के परफेक्ट आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातील एक टक्का गायकी आत्मसात करता आली तरी कार्यक्रमाची फलश्रुती झाल्यासारखे वाटेल! याच कार्यक्रमाविषयी चर्चा करताना आशाताईंचा उदात्तपणा समोर आला.


त्यांनी कार्यक्रमात प्रचंड रस दाखवला. नेहमीप्रमाणे मला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड करतानाही त्यांचा सक्रीय सहभाग होताच. निवड प्रक्रियेमध्ये त्यांच्या आवडीची गाणी घेण्याचा आग्रहसुद्धा होता. एखादे गाणे कार्यक्रमात का घेतले नाही, असेही त्या हक्काने विचारत.


एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कार्यक्रमाला यायची इच्छा असल्याचेही बोलून दाखवले होते. पण प्रेक्षकांना आशाताईंची गाणी म्हणून दाखवणे आणि खुद्द ताईंसमोर त्यांची गाणी गाण्याचा प्रयत्न करणे यामध्ये हिमतीची तफावत असल्याचे तेव्हा प्रकर्षाने जाणवले. त्याचबरोबर त्यांचे मन किती मोठे आणि निरभ्र आहे याचीही प्रचिती आली. आभाळाएवढे काम करूनही मंगेशकर कुटुंबीयांमध्ये अहंकाराला थारा दिसला नाही.


अत्यंत मनमिळाऊ कुटुंबामधील आशाताईसुद्धा ममतेने विचारपूस करत तेव्हा आयुष्यात काही कमावण्यामध्ये यशस्वी झाल्यासारखे वाटे. त्यामुळेच त्यांच्याकडे जाताना कधीच कोणताही संकोच वाटला नाही. ‘सलाम’ कार्यक्रमाचा पंचविसावा भाग झाल्यानंतर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठीही त्यांच्या घरी गेले होते. केव्हाही आशाताईंकडे गेल्यावर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. एका अन्नपूर्णेप्रमाणे आदरातिथ्य करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.


त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रत्येक भेटीनंतर अनुभव श्रीमंत वाटते. त्यांच्या सहवासात खुललेल्या आल्हाददायक आठवणींची पोतडी नेहमीच सोबत राहील.आशाताईंच्या भेटीविषयी बोलताना एक प्रसंग आवर्जून लिहावासा वाटतो. त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मी भेटायला गेले होते. आपल्या मुलाचे अकाली जाणे हा एका आईसाठी किती जीवघेणा प्रसंग! पण तरीही त्या रडत नव्हत्या.


‘मुलाच्या विरहामध्ये रडायचे नाही असे मी ठरवले आहे’ हे आम्हाला सांगताना त्यांनी धीर कुठून आणला असेल? एकदा सहजच भेटायला गेले असता त्या खोलीत एका पंजाबी गाण्याचा रियाज करत बसल्या होत्या. कसला रियाज करता आहात, असे विचारले असता त्यांनी मिश्किलपणे सांगितले, ‘अगं, माझा पंजाबमध्ये कार्यक्रम आहे. तिथल्या प्रेक्षकांना आवडेल यासाठी पंजाबी गाण्याने सुरुवात करेन म्हणते! त्याचाच रियाज करत बसले आहे.’


त्यांच्या या उत्तराने अवाक् झाले. या वयातही कलेप्रती एवढे समर्पण क्वचितच पहायला मिळते. त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्ये उत्साहाचा झरा वाहत असायचा. कार्यक्रमामध्ये गाण्यांदरम्यान साडी बदलणे असो कवा चाहत्यांच्या फर्माइशीला न्याय देणे असो, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये कुठ्न येतो हे समजण्यासाठी आपला सारा जन्मच अपुरा पडेल! आता तर ती संधीही नाही.

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.