मुंबई : संगीत विश्वातील प्रसिद्ध नाव, आशा भोसले (Asha Bhosle) आज काळाच्या पडद्याआड गेलंय. पण, त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या नेहमीच आपल्यात राहतील. सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका आणि भारतरत्न, 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांनी तब्बल सहा दशकं आपल्या गाणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
केवळ हिंदी, मराठीच नाहीतर २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. पण, आशा भोसले यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे मोठा गदारोळ झालेला.मात्र, पुढे त्याच गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल म्हणून गौरवण्यात आलं.
आशाताईंनी अनेक गाणी गायली, पण त्यापैकी एका गाण्यामुळे मोठा गदारोळ झालेला. हे गाणं रेडिओवर बॅन करण्यात आलेलं, तर दूरदर्शनवरील प्रक्षेपण थांबवण्यात आलेलं. पण तरीही, तेच गाणं एवढं गाजलं की, आजही अनेकजण हे गाणं म्हणतात. आशाताईंच्या आवाजातल्या या गाण्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ते गाणं म्हणजे, १९७१ मधील गाजलेला 'ब्लॉकबस्टर' सिनेमा 'हरे रामा हरे कृष्णा' मधील, देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'दम मारो दम' आशा भोसले यांच्या आवाजातील 'दम मारो दम' हे गाणं प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडलं.
या गाण्याचं संगीत आर.डी. बर्मन यांनी दिलं होतं, तर गीतलेखन आनंद बक्षी यांनी केलेलं. या गाण्यात झीनत अमान यांना 'हिप्पी' अवतारात, हातात 'चिलिम' घेऊन धूम्रपान करताना चित्रित करण्यात आलेलं, यामुळे झीनत अमान यांना असं दाखवणं म्हणजे, अंमली पदार्थांच्या संस्कृतीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं गेलं आणि त्यामुळे या गाण्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले. अनेक समीक्षकांनी या गाण्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि हे गाणं भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचं मानलं गेलं. ते तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
माहितीनुसार, या गाण्याभोवतीचा वाद इतका चिघळला की, 'ऑल इंडिया रेडिओ'नं चक्क त्यावर बंदी घालण्यापर्यंत मजल मारली. तसेच, सिनेमाच्या दूरदर्शनवरील प्रसारणादरम्यान 'दूरदर्शन'नं हे गाणं पूर्णपणे वगळलं होतं. जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातून 'दम मारो दम' हे गाणं पूर्णपणे काढून टाकण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, याच गाण्यासाठी आशा भोसले यांना 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कारही मिळाला होता.
देव आनंद यांचा या गाण्याच्या माध्यमातून सिनेमात अंमली पदार्थांच्या विरोधात संदेश देण्याचा उद्देश होता, पण, या गाण्याची चाल आणि चित्रीकरणामुळे या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.