- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.